पणजी : राज्यात होणाऱ्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची जय्यत तयारी राज्यभर सुरू आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी सुमारे ४५० कोटींपेक्षा जास्त खर्च येणार आहे. केंद्र सरकारदेखील आम्हाला यासाठी आर्थिक मदत करत आहे. आतापर्यंत केंद्र सरकारनेे मागील विविध स्पर्धांचे आयोजन व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची साधनसुविधा उभारणीसाठी वेळोवेळी आर्थिक मदत केली आहे, अशी माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
३७वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा राज्यात होणे, ही गोमंतकीयांसाठी मोठी गोष्ट आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या तयारीबाबत आम्ही कुठेच कमतरता ठेवलेली नाही. जे शक्य आहे, ते आम्ही केंद्र सरकारच्या मदतीने केले आहे. तसेच अनेकजण या स्पर्धेच्या आयोजनामागे आर्थिक घोटाळा झाल्याचे आरोप करतात; परंतु यामध्ये काहीच तथ्य नसून, सर्व गोष्टी पारदर्शकरीत्या झालेल्या आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या मदतीनेच या सर्व गोष्टी झालेल्या आहेत, असे गावडे यांनी यावेळी सांगितले.
राज्य सरकारला जे शक्य आहे, ते सरकारने केले आहे. साधनसुविधा तयार करण्यात आल्या आहेत. तसेच इतर प्रक्रिया सुरू आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) देखील वेळाेवेळी राज्यात येऊन याबाबतची पाहणी केली आहे. ते आमच्या कामावर संतुष्ट आहे. आता इतर राज्यातील विविध खेळासाठीच्या संघाची उपस्थिती सुनिश्चित करणे, हे आयओएचे काम आहे आणि ते हे काम बऱ्यापैकी करत आहे, असेही गावडे यांनी अधिक माहिती देताना सांगितले.
क्रीडा संघटनेच्या समस्या सोडविण्यावर भर
क्रीडा स्पर्धा संबंधित कुणाला काही शंका किंवा अडचणी आहे, तर त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी सर्वांसाठी उपलब्ध आहे. क्रीडा संघटना नाखूश असल्याचे सांगण्यात येते; परंतु अनेक संघटनांनी माझ्याशी संपर्क साधत आम्ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तुमच्यासोबत असल्याचे सांगितले आहे. तसेच अनेक क्रीडा संघटना निवेदन घेऊन माझ्याकडे आल्या होत्या की, त्यांना सरावासाठी मैदान उपलब्ध करून द्यावे, त्यांना ४८ तासांच्या आत मी मैदान उपलब्ध करून दिलेले आहे. गोवा ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षांसोबत देखील बोलणे झाले असून, ते स्पर्धेच्या तयारीबाबत समाधानी आहेत, असे मंत्री गावडे यांनी अधिक माहिती देताना सांगितले.