समीर नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'अनुसूचित जाती, जमातीबाबत सरकार गंभीर नाही, हे हळूहळू स्पष्ट व्हायला लागले आहे. मी जे काही प्रेरणा दिन कार्यक्रमात बोललो, ती माझी नाराजी नाही; तर आमच्या समाजातील लोकांची नाराजी व्यक्त केली,' असे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी 'लोकमत'ला सांगितले.
एससी, एसटी समाजांतील लोकहिताच्या कुठल्याच गोष्टी वेळेत होत नाहीत. ज्या 'उटा' आंदोलनामुळे भाजपचे सरकार बनले, त्या लोकांच्या भावनांशी खेळू नका, एवढेच मला म्हणायचे होते, असे ते म्हणाले.
गावडे म्हणाले, 'एससी, एसटींच्या विविध विषयांवरून मुख्यमंत्र्यांकडे दोन ते तीन वर्षे पाठपुरावा सुरू आहे. मी पूर्वीदेखील खासगीत मुख्यमंत्र्यांना भेटून नाराजी व्यक्त केली; पण काहीच झालेले नाही. मुख्यमंत्र्यांचाही यात दोष नाही. त्यांच्याकडे अनेक खाती आहेत, त्यामुळे ते जास्त लक्ष देऊ शकत नाहीत; पण त्यांनी निर्देश दिल्यानंतर खात्याकडून त्वरित गोष्टी झाल्या पाहिजेत. पण तसे होत नाही. माझ्याकडे खाते असताना एससी, एसटींना २० दिवसांत योजनांचा लाभ मिळायचा; पण आता यासाठी महिने लागत आहेत.'
मीदेखील सरकारचा भाग आहे; पण ज्या गोष्टीची लोकांना गरज आहे, ती गोष्ट काम आहे. मिळवून देणेही माझेच सरकारच मागण्या पूर्ण करत नसेल तर लोक पुन्हा आंदोलन उभारण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, हे अडथळे आणणाऱ्याऱ्यांनी लक्षात ठेवावे,'
मंत्रिमंडळ फेरबदल अफवाच
मंत्रिमंडळ फेरबदल केवळ अफवाच आहे. यात कुणाचे राजकारण आहे आणि कोणाला याचा फायदा आहे, हे मला माहीत नाही, असे मंत्री गोविंद गावडे म्हणाले. याबाबत त्यांनी सांगितले, 'प्रदेशाध्यक्षांनी याबाबत स्पष्टीकरण देत ही केवळ अफवा असल्याचे जाहीर केले आहे. भविष्यात काहीही होवो; पण मी नेहमीच लोकांसोबत असणार आहे, हे मात्र निश्चित.'