लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : जनरेट्यामुळे राज्य सरकारने पेडणे झोनिंग प्लॅनबाबतीत हरकती, सूचना पाठवण्यासाठी आणखी ३० दिवस मुदत वाढवून दिली आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारने झोन प्लॅन प्रक्रियेत सरकारला सहकार्यासाठी संयुक्त सचिव स्तरावरील अधिकारी देण्याची तयारी दाखवली.
झोनिंग प्लॅनसाठी मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांनी केली. भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी चर्चेने, जनतेच्या आग्रहानंतर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पेडणे तालुक्यातील लोकांकडून हरकती, सूचनांकरिता मुदतवाढ दिली जावी, अशी मागणी करणारी निवेदने सरकारकडे आली आहेत. प्लॅन घाईघाईत न करता सर्वांना विश्वासात घेऊन करावा, अशी आग्रही मागणी आहे. मंत्री विश्वजित राणे म्हणाले की, 'सरकारकडे काही सूचना, हरकती आलेल्या आहेत. त्यांची छाननी करुन पुढील प्रक्रिया केली जाईल. प्लॅन सर्वसमावेशक व्हावा यासाठी मुदतवाढ दिली आहे.
मोपा ओडीपीवरही असंतोष
दरम्यान मोठा पीडीएने जो ओडपी तयार कला आहे त्याबाबतही लोकांत असंतोष आहे. कारण विमानतळाबाहेर अनेक मजली अनेक उंच इमारती येतिल असे सुत्रांनी संगितले. तर, मोपा ओडीपी' हे मोपा विमानतळ क्षेत्रापुरते मर्यादित असून ते मोपा विमानतळ क्षेत्राबाहेर लागू होत नाही, असा दावा सरकार करत आहे.
विषय दिल्लीपर्यंत....
दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत दोन दिवसांपूर्वी दिल्लीला गेले होते. त्यांनीही झोनिंग प्लॅनबाबत केंद्रीय नेतृत्त्वाला माहिती दिलेली आहे. झोनिंग प्लॅन मसुदा सोमवारपर्यंत तो मागे न घेतल्यास पुढील दहा-पंधरा दिवसात लोकांमध्ये जागृती करून पेडणेंत सर्वत्र रस्ता रोको करू, असा इशारा मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी दिला होता. त्यानंतर हा विषय आता दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोचला आहे.
विश्वजित राणे आज-उद्या दिल्लीत!
पेडणे झोनिंग प्लॅनचा विषय दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वापर्यंत पोचला आहे. मंत्री विश्वजित राणे हे आज सोमवारी किंवा उद्या मंगळवारी दिल्लीला जाणार असून या विषयावर पक्षाच्या केंद्रीय नेत्यांना भेटून माहिती देतील. गरज पडल्यास हरकती, सूचना सादर करण्यासाठी आणखीही मुदतवाढ दिली जाईल. लोकांना त्यांची मते मांडण्यासाठी अधिकाधिक संधी मिळायला हवी, असे विश्वजित यांचे म्हणणे आहे. झोन प्लॅनबाबत आम्हाला घाई नाही, असे त्यांनी याआधीच सांगितले आहे.