पणजी - गोव्यातील मांडवी नदीत जी पाच कॅसिनो जहाजे सध्या आहेत, त्यांना मांडवीत राहण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ गोवा मंत्रिमंडळाने बुधवारी जाहीर केली. कॅसिनो हे गोव्याच्या पर्यटन व्यवसायाचा सध्या एक भाग बनून राहिले आहे.
मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनो जहाजांना मांडवीत राहण्यासाठी सरकार सातत्याने मुदतवाढ देत आले आहे. या जहाजांना मांडवीबाहेर पर्यायी जागा देण्याचा विचार सरकार गेली पाच वर्षे व्यक्त करत आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक पार पडली. यापूर्वी कॅसिनोना मांडवी नदीतून बाहेर जाण्यास सहा महिन्यांची मुदत सरकारने दिली होती. ती या महिन्याच्या अखेरीस संपुष्टात येत असल्याने आता आणखी मुदतवाढ दिली गेली.
दरम्यान मुख्यमंत्री पर्रीकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की येत्या डिसेंबरमध्ये कॅसिनोंबाबतचे मुख्य धोरण सरकार जाहीर करील. त्यासाठी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये चर्चा सुरू होईल. तोपर्यंत तरी मांडवीत कॅसिनो जहाजे असतील.
गोव्यात पंचतारांकित हाॅटेलांमध्ये असलेल्या कॅसिनोंमध्ये आणि नदीतील तरंगत्या जहाजांमध्ये कॅसिनो जुगार चालतो. कॅसिनो जुगाराचे व्यसन जडलेले गोमंतकीय आणि पर्यटकही आर्थिकदृष्ट्या उध्वस्त होत असल्याची तक्रार एनजीओ व काही आमदारही करत असले तरी सरकार कॅसिनो बंद करू शकलेले नाही.