पणजी : विदेशी पाहुण्यांना गोव्याकडे आकर्षित करण्यासाठी जागतिक पर्यटन मेळाव्यांमध्ये मंत्री, अधिकारी असा मोठा लवाजमा उपस्थिती लावून कोट्यवधी रुपये खर्च करतात परंतु विदेशी पर्यटकांची संख्या तुलनेत वाढलेली दिसत नाही. उलट ती कमीच होत चालली आहे. या पर्यटक हंगामात चार्टर विमाने ५0 टक्क्यांनी घटली. रशियन पर्यटकांचे प्रमाण कमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या सार्वजनिक लेखा समितीनेही या निष्फळ दौ-यांबाबत पितळ उघडे पाडले आहे.
वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट तसेच विदेशात ठिकठिकाणी होणा-या पर्यटनविषयक मेळ्यांमध्ये मंत्री, अधिकारी भाग घेत असतात. विदेशात ‘रोड शो’ही केले जातात. २00७ ते २0१२ या कालावधीत खात्याच्या अधिका-यांनी ३८ आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळ्यांमध्ये भाग घेतला आणि १५ रोड शो केले. त्यावर १९ कोटी ४७ लाख रुपये खर्च करण्यात आले परंतु फलित काहीच झाले नाही, असे सार्वजनिक लेखा अहवालात म्हटले आहे.
२0१२ नंतर मंत्री, अधिका-यांनी केलेल्या दौºयांच्या बाबतीतही स्थिती काही वेगळी नाही. गेल्या ५ ते ७ नोव्हेंबर या काळात लंडनमधील वर्ल्ड टुरिझम मार्टमध्ये भाग घेतला त्यावर तब्बल १ कोटी १७ लाख खर्च करण्यात आला. त्याआधी ८ ते १0 ऑक्टोबर या कालावधीत जॉर्डन येथे, १७ ते १९ ऑक्टोबर या काळात सिंगापूर येथे (५५ लाख रुपये खर्च), ११ते १३ सप्टेंबर या काळात मॉश्को येथे (७७ लाख रुपये खर्च), ५ ते ७ सप्टेंबर या काळात चीनमध्ये बीजिंग येथे (३४ लाख रुपये खर्च) आदी पर्यटन मेळ्यांमध्ये भाग घेतला. गेल्या १७ सप्टेंबर रोजी रशियामध्ये ‘रोड शो’ करण्यात आला त्यावर २९ लाख रुपये खर्च करण्यात आले.
पर्यटकांची नवी बाजारपेठ मिळवण्यासाठी हे दौरे केले जातात. परंतु त्याचे फलित दिसत नाही. चार्टर विमानांची संख्या या पर्यटक हंगामात घटली आहे. पेगास टुरिस्टिक या बड्या रशियन कंपनीने नुकसान सोसावे लागल्याने चार्टर विमानांमध्ये कपात केली. दरवर्षी सुमारे ३00 चार्टर विमान ही एकमेव कंपनी गोव्यात आणत असे. या पर्यटक हंगामात विदेशींबरोबरच देशी पर्यटकांची संख्याही घटली आहे. याचे कारण हॉटेलांमधील खोल्यांचे प्रचंड वाढलेले भाडे तसेच एकूणच गोवा हे महागडे डेस्टिनेशन ठरत आहे असेही सांगितले जाते.