लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : 'आज, सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात भाजप सरकारने आत्मस्तुतीच्या कार्यक्रमांवर आणि जाहिरातींवर खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांची आकडेवारी समोर येणार आहे. अधिवेशनात अपयशी भाजप सरकारचा खरा चेहरा समोर येईल. गोंधळलेले भाजप सरकार वायफळ खर्च कमी करण्याऐवजी अधिवेशनाच्या कार्यकाळात कपात करत आहे,' असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.
सर्व विरोधी आमदार लोकांचे प्रश्न व समस्यांच्या मुद्द्यावर भाजप सरकारला जाब विचारण्यासाठी सज्ज आहेत. अमली पदार्थ व्यवहार, वेश्या व्यवसाय, डान्स बार, खंडणीखोरी, पर्यटन क्षेत्रातील दलाल आदी मुद्द्यांवर सरकारला उघडे पाडणार आहे, असे युरी यांनी सांगितले.
कुंकळी औद्योगिक वसाहतमधील बेकायदेशीर कारभार, प्रदूषण तसेच अतिक्रमण, आरोग्य सुविधांचे निर्माण, वाहतूककोंडी, कुंकळ्ळी मतदार संघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे संरेखन या मतदार संघातील प्रमुख समस्या प्राधान्यक्रमाच्या यादीत आहेत. समाजकल्याण योजनांचे लाभार्थी, माध्यान्ह आहार पुरवठादार, पॅरा टीचर्स, गरीब परिस्थितीतील खेळाडू, गेल्या अनेक महिन्यांपासून पैसे न मिळालेल्या कंत्राटदारांना विधानसभेच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याचे आवाहन करणार आहे, असे आलेमाव म्हणाले.
शॅक ऑपरेटर्सच्या समस्यांवरील 'लक्षवेधी सूचनेवर मी आधीच स्वाक्षरी केली आहे. पक्षाशी संलग्नता बाजूला ठेवून इतर सर्व आमदार पारंपरिक व्यवसायाचे रक्षण करण्यासाठी त्याला पाठिंबा देतील असे ते म्हणाले.
काँग्रेसची तयारी
काँग्रेसच्या विधानसभेच्या प्रश्नांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात भाजप सरकारचे अपयश, आपत्ती व्यवस्थापन, म्हादईच्या मुद्द्यावर जाणीवपूर्वक केलेली डोळेझाक, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रण ठेवण्यात आलेले अपयश, दिवाळखोरीमुळे सरकारी खात्यांतील रिक्त पदे भरण्यात आलेले अपयश व कार्यक्रम तसेच प्रसिद्धीवर केलेली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी याचा तपशील अधिवेशनात उघड केला जाईल, असे युरी यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"