पणजी : राज्यातील वीज बिलांमध्ये खात्याकडून व गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडूनही प्रचंड चुका करण्यात आलेल्या असून या चुकांमुळे वीज ग्राहक हैराण झाले आहेत. बिलांमध्ये दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे; पण तेही तापदायक बनल्याने ग्राहक जेरीस आले आहेत.वीज खात्याने पूर्वी वीज बिलांचे काम हे बंगळुरू येथील एका कंपनीकडे सोपविले होते. त्या कंपनीने घोळ घातल्यानंतर बिलांचा विषय वीज खात्याने गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडे (जीईएल) सोपविला. तथापि, जीईएलही काहीच उपाय काढू शकले नाही. उलट अजूनही हजारो रुपयांची वीज बिले ग्राहकांना येत आहे. ज्यांना दरमहा केवळ पाचशे-सहाशे रुपयांचेवीज बिल येत होते, त्यांना आता सात-आठ हजारांचे बिल येऊ लागले आहे. हे बिल दुरुस्त करून घेण्यासाठी ग्राहकांना वीज खात्याच्या कार्यालयांमध्ये व जीईएलमध्येही खेपा माराव्या लागत आहेत.वीज कार्यालयात गेल्यानंतर अभियंते ग्राहकासोबत घरी येतात. ते वीज मीटरची पाहणी करतात व मग वीज बिल कपातीसाठी दुरुस्तीची प्रक्रिया सुरू होते. या सगळ्यात ग्राहकाचा वेळ वाया जातो; कारण केवळ एकदा खेप मारली म्हणून अभियंते घरी येत नाहीत. त्यांच्याकडे दोन-तीनवेळा खेपा माराव्या लागतात. वीज बिल कमी करून दिले तरी ते एकदम कमीही होत नाही. पाच हजारांचे बिल आले, तर दोन हजार रुपयांपर्यंत कमी करून दिले जाते; पण प्रत्यक्षात ज्या ग्राहकाला दर महिन्यास केवळ पाचशे रुपयांचे वीज बिल यायचे, त्याने पाच हजार रुपये का भरावेत, असा प्रश्न ग्राहक उपस्थित करतात.वीज बिलांमधील चुकांचा हा घोळ गेले तीन महिने सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा भुर्दंड बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी याविषयी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना संताप व्यक्त केला. सामान्य माणसांचे कंबरडे वीज बिलांनी मोडून टाकले आहे, असे डिमेलो म्हणाले. तुमचा मीटर सदोष आहे, असेही अनेकदा वीज खाते लोकांना सांगते. वीज मीटर नादुरुस्त असेल, तर ती चूक खात्याची आहे. त्यांनीच तो दिलेला आहे, असे डिमेलो म्हणाले. वीज खात्याच्या सर्व कार्यालयांमध्ये बिलांबाबत प्रचंड गोंधळ आहे, असेही ते म्हणाले. (खास प्रतिनिधी)े
वीज बिलांच्या दुरुस्तीचे त्रांगड
By admin | Published: May 20, 2015 1:46 AM