म्हापसा - राज्यातील अमली पदार्थांच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यास सरकारला आलेल्या अपयशाबद्दल काँग्रेसने सरकारवर जोरदार टीका केली आहे. तरुणांवर परिणामकारक ठरत असलेली ही ड्रग्सची समस्या महामारीच्या प्रमाणात पोहोचली आहे. यामुळे गोव्याच्या पर्यटन उद्योगाची प्रतिमा देखील गंभीरपणे होतील. त्याचे दुरोगामी परिणाम राज्याला सहन करावे लागतील, अशी टीका प्रदेश काँग्रेस सरचिटणीस विजय भिके यांनी केली आहे. येथील पक्ष कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते.
भाजप सरकारच्या कार्यकाळात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे, ज्यामुळे गोव्याला ड्रग्ज, गुन्हेगारी आणि वेश्याव्यवसायाचे केंद्र म्हणून नावलौकिक प्राप्त झाला आहे. कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा, सत्ताधारी पक्षातील काही प्रतिनिधी यांच्यामुळे यात वाढ झाल्याची टीकाही भिके यांनी बोलताना केली.
काही दिवसांपूर्वी हणजुण परिसरातील एका ड्रग्ज लॅबवर छापा टाकून राज्यात ५ कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले. गोवा पोलिसांच्या नजरेखाली सुरू असलेल्या या प्रकारावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापा मारून त्यांच्यातील पितळ उघडे पाडले. यातून सरकारचे अपयश दिसून येत असल्याचे भिके म्हणाले.
उत्तर गोवा जिल्हा युवा अध्यक्ष रिनाल्डो रोझारियो यांनी अशा प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यास युवा पिढीला वाचवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे. ड्रग्जचे नेटवर्क संपुष्टात आणावे, अशी विनंती करून या संबंधी युवकांत जागृती केली जाणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी उत्तर गोवा अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर तसेच महेश नाडर, विकास प्रभू उपस्थित होते.