सक्षम उमेदवार देण्यात अपयश; उत्तरेतील लढाईत कमकुवत संघटनात्मक बांधणीमुळे काँग्रेसची हार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2024 07:45 AM2024-06-07T07:45:16+5:302024-06-07T07:46:28+5:30
हेच कारण नाईक यांच्या विजयाचे मुख्य कारण मानले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : उत्तर गोव्यातून सलग सहाव्यांदा विजयी झालेले भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांना समर्थपणे टक्कर देऊन कडवे आव्हान देण्यासाठी त्यांच्याविरोधात सक्षम उमेदवार देण्यास काँग्रेस पक्षाला अपयश आले आहे. हेच कारण नाईक यांच्या विजयाचे मुख्य कारण मानले जाते.
सन २००९च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन उमेदवार जितेंद्र देशप्रभू यांनी दिलेले कडवे आव्हान वगळता इतर सर्व निवडणुकांत नाईक यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर सहज विजय मिळवला आहे. राज्यातील लोकसभेच्या दोन जागांसाठी मतदारांनी उत्तरेतून वेगळा, तर दक्षिण गोव्यातून वेगळा निर्णय दिला. उत्तरेतून काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला, तर दुसऱ्या बाजूने दक्षिण गोव्यातून पक्षाचा उमेदवार भरघोस अशा मतांनी विजयी झाला.
उत्तर गोव्यातून पक्षाच्या दारुण पराभवाची कारणमीमांसा करण्याची तसेच पक्षाची पुनर्बाधणी करून गतवैभव प्राप्त करून देण्याची वेळ आली असल्याचे मत काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत. नाईक यांनी सलग सहावेळा उत्तरेतून विजय प्राप्त केला. यात खलप यांना त्यांच्याकडून दोनवेळा पराभवाचा सामना करावा लागला. २००४ साली राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर रिंगणात उतरलेले माजी मुख्यमंत्री स्व. डॉ. विल्फ्रेड डिसोझा, २००९ साली जितेंद्र देशप्रभू, २०१४ साली रवी नाईक, तर २०१९ साली गिरीश चोडणकर यांचा पराभव नाईक यांनी केला आहे.
सन २००९च्या निवडणुकीत राज्यात तसेच केंद्रात काँग्रेसचे सरकार सत्तेवर असूनही नाईक विजयी ठरले होते. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी दिगंबर कामत असताना आणि माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, विश्वजित राणे, बाबूश मोन्सेरात, अॅड. दयानंद नार्वेकर यांच्यासारखे दिग्गज नेते सत्ताधारी पक्षात असतानाही श्रीपाद नाईक यांनी विजय प्राप्त केला. ही निवडणूक वगळता इतर निवडणुकीत नाईक यांनी सहज विजय प्राप्त केला आहे.
काँग्रेसच्या दृष्टीने विचार केला तर बऱ्याच मतदारसंघातून पक्ष संघटना अस्तित्त्वात नव्हती. समन्वयाचा अभाव होता. नियोजनबद्ध प्रचारासाठी पावले उचलण्यात आली नव्हती. सत्तरीसारख्या तालुक्यात तर पक्षाजवळ कार्यकर्ते सुद्धा नव्हते. नेत्यांनी प्रचारात सहभागी होणे टाळल्याने पराभव स्वीकारावा लागला, असे कार्यकर्ते बोलू लागले आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाचा एकमेव आमदार असलेल्या काँग्रेसला २० पैकी फक्त ४ मतदारसंघात आघाडी मिळाली. यात बार्देशमधील हळदोणा आणि कळंगुट या दोन, तर तिसवाडीतील सांताक्रुझ आणि सांत आंद्रे या दोन मतदारसंघांचा समावेश होतो.
३१ टक्के मते या निवडणुकीत काँग्रेसला उत्तर गोव्यात मिळाली. मागील निवडणुकीत २०१९ साली तत्कालीन उमेदवाराला ३८ टक्के मते मिळाली होती. यावेळी काँग्रेसच्या मतांत ७ टक्क्यांनी घट झाली. राज्यातील काँग्रेसच्या मतांत ४३ टक्क्यांवरून ४० टक्के अशी घट झाली आहे.
निधी खर्चात आखडता हात
उत्तर गोव्यातून रिंगणात उतरलेले भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी निवडणुकीदरम्यान कार्यकर्त्यांसाठी खर्च केला, मात्र, काँग्रेस पक्ष आणि उमेदवार अॅड. रमाकांत खलप यांच्याकडून फारसा खर्च करण्यात आला नाही. त्यामुळे बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांत उत्साह नव्हता. अगदी अखेरच्या क्षणी बूथवर ५ ते १० हजार रुपये खर्चास देण्यात आले होते, असे सांगण्यात येते.
दक्षिण गोव्यासह उत्तर गोव्यातही आता आम्हाला पक्ष संघटना मजबूत करण्याची सक्षम अशी यंत्रणा उभारण्याची गरज आहे. पक्षाने यासाठी एकजुटीने प्रयत्न करून कार्य करावे लागेल. - रमाकांत खलप.
आगामी काळात पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देणार आहे. सर्व कार्यकर्त्यांनी काम केले असले तरी मजबुतीसाठी आढावा बैठक घेऊन त्रुटी दूर केल्या जातील. पर्ये, वाळपई, साखळी, मये मतदारसंघात फार कमी मते पडली. तेथील गट समित्यांची बैठक घेऊ. - विरेंद्र शिरोडकर, जिल्हाध्यक्ष उत्तर गोवा.