म्हापसा : हणजूण येथील शापोरा किल्ल्याच्या पायथ्याशी बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेले तात्पुरते व्यावसायीक गाळे पुरातत्व खात्याने पोलीस बंदोबंस्तात जमीनदोस्त केले.शापोरा किल्ल्याचे सौंदर्यीकरण करण्याकरीता व या किल्ल्यावर जाण्याकरीता पायथ्याशी डोंगर फोडून रस्त्याचे काम करण्यात येत आहे. हा रस्ता एका राजकारण्याला फायदेशीर ठरणारा आहे असे सांगून स्थानिकांनी हे काम बंद पाडले होते. हल्लीच पुरातत्व खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी या किल्ल्याची पाहणी करून बंद पडलेले काम पुन्हा सुरू करण्यास सा. बां. खात्यास सांगितले होते. दरम्यान, या ठिकाणी अनेक स्थानिकांनी पर्यटकांच्या सोयीकरीता व आपल्या उदरनिर्वाहाची सोय म्हणून लहान व्यवसाय सुरू केले. या करीता त्यांनी तात्पुरते गाळे उभारले होते. आज ते धडक कारवाईत जमीनदोस्त करण्यात आले. यावेळी म्हापशाचे उपजिल्हाधिकारी गौरिश शंखवाळकर, मामलेदार दशरथ गावस, इतर संयुक्त मामलेदार पुरातत्व खात्याच्या अधिकारी बी. मदेरा उपस्थित होत्या. या तात्पुरत्या व्यावसायीक बेकायदेशीर गाळ्याबाबत स्थानिकांकडूनच तक्रार आली होती. यापूर्वी मोजणी केली तेव्हा ते १९ होते. आता त्यात वाढ झाली असावी असे पुरातत्व खात्याचा अधिकारी बी. मदेरा यांनी सांगितले. तर सर्व गाळे बेकायदा होते व यात बेकायदेशीर मद्यविक्री होत होती अशा तक्रारी होत्या तसेच आपण कायदा सुरक्षा सुरळीत राखण्यासाठी येथे हजर असल्याचे उपजिल्हाधिकारी गौरिश शंखवाळकर यांनी सांगितले. सरकारने गरीबाचे गाळे मोडून त्यांच्या पोटावर पाय दिला आहे. बेकायदेशीररित्या बांधण्यात येणारे मोठे हॉटेल बांधकाम प्रकल्पावर कोणतीही कारवाई होत नाही. नोकरी नाही म्हणून लहान व्यवसाय करणाºयांवर कारवाई होते. सरकारने त्यांना नोकºया तरी द्याव्या किंवा व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अन्यथा त्या सर्वांना सोबत घेऊन आंदोलन छेडावे लागेल असे शापोरा बोट मालक संघटनेचे माजी अध्यक्ष बलभीम मालवणकर यांनी सांगितले.
शापोरा किल्ल्याच्या पायथ्याशी उभारलेले बेकायदेशीर गाळे जमीनदोस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 11:26 PM