पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष लुईझिन फालेरो यांच्याविरुद्ध काही काँग्रेस आमदार संघटित होऊ लागले आहेत. काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वामध्ये बदल केला जावा, अशी मागणी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यापर्यंत काही काँग्रेस नेत्यांनी पोहोचविली आहे. काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी कोणाचे नाव घेतले नाही; पण स्थानिक नेतृत्वाने राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी त्यांनी शुक्रवारी केली.रेजिनाल्ड नुकतेच दिल्लीला जाऊन राहुल गांधी यांना भेटून आले. गोव्यात कधीही मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, तत्पूर्वी काँग्रेस पक्ष बळकट करण्याची गरज आहे, असा मुद्दा त्यांनी गांधी यांच्यासमोर मांडला. काँग्रेसचे आणखी काही आमदार सध्या दिल्लीतील काँग्रेसच्या अन्य केंद्रीय नेत्यांच्या संपर्कात आहेत. काहीजण दिग्विजय सिंग यांच्या संपर्कात असून फालेरो यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेतले गेले, तर भविष्यात गोव्यात काँग्रेसचे सरकार येऊ शकते, असा मुद्दा ते मांडत आहेत.प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत रेजिनाल्ड, गिरीश चोडणकर व अन्य काहीजण आहेत. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांना पदावरून काढावे, अशी रेजिनाल्ड यांची मागणी नाही. कवळेकर यांना विरोधी पक्षनेतेपद द्यावे, हा प्रस्ताव माझाच होता, असे रेजिनाल्ड यांनी ‘लोकमत’ला सांगितले. कवळेकर यांना आमचा आक्षेप नाही; पण ज्या स्थानिक नेत्यांमुळे गोव्यात काँग्रेसचे सरकार आले नाही, त्या नेत्यांनी राजीनामा द्यायला हवा, असे रेजिनाल्ड म्हणाले. लोकांनी काँग्रेसला १७ आमदार निवडून दिले. भाजपकडे केवळ १३ आमदार आहेत. तरीदेखील गोव्यात काँग्रेसचे सरकार अधिकारावर येऊ शकले नाही. या अपयशाबाबत स्थानिक नेतृत्वाने राजीनामा देऊन बाजूला व्हायला हवे. पदे अडवून ठेवू नयेत, असे रेजिनाल्ड म्हणाले. लवकरच दोन मतदारसंघांत पोटनिवडणुका होतील. तसेच मध्यावधी निवडणुकाही होऊ शकतात; कारण आघाडी सरकारमध्ये काही ठिक चाललेले नाही. अशावेळी काँग्रेस पक्षात फेररचना करून तो बळकट करायला हवा. मी राहुल गांधींसमोरही हाच मुद्दा मांडला आहे, असे रेजिनाल्ड यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेसचे अन्य काही आमदार सध्या अस्वस्थ आहेत. विरोधी बाकांवर यापूर्वीही आम्ही बसलो आहोत. आता पुन्हा विरोधी बाकांवर बसलो तर निवडणुकीवेळी निवडून येणे कठीण होईल, असे काहीजणांना वाटते.(खास प्रतिनिधी)
फालेरोंविरुद्ध बंड!
By admin | Published: April 15, 2017 2:01 AM