पणजी : कूळ कायद्यातील व मुंडकार कायद्यातील दुरुस्त्या या सरकारने कुणाच्या सांगण्यावरून कुणाचे हीत साधण्यासाठी केल्या आहेत याचे स्पष्टीकरण द्यावे, असे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी कूळ-मुंडकार संघर्ष समितीच्या व्यासपीठावरून सांगितले. या प्रकरणात न्यायालयात जाण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. गोव्यात कूळ कायद्यातील दुरुस्ती तसेच मुंडकार कायद्यातील दुरुस्ती आणून एकाचवेळी कुळांना आणि मुंडकारांना न्यायालयाचे उंबरठे झिजविण्यासाठी प्रवृत्त करण्याचा निर्णय सरकारने कोणाच्या सांगण्यावरून घेतला होता आणि कुणाच्या हितासाठी घेतला होता, हेही आता स्पष्ट करावे; कारण या दुरुस्त्या कुळांच्या आणि मुंडकारांच्या हिताच्या विरोधी आहेत, याची जाणीव सरकारला होती, असे रेजिनाल्ड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. सरकार आता सनसेट कलम काढण्याची भाषा करीत आहे. याचा अर्थ दुरुस्त्या या जनहिताच्या नाहीत, याची जाणीव सरकारला आाहे. असे असतानाही या दुरुस्त्या का करण्यात आल्या आणि आता पूर्ण दुरुस्त्या मागे घेण्याऐवजी एकच कलम मागे घेण्याची भाषा का बोलली जाते, असा प्रश्न त्यांनी केला. अधिवेशनात या कायद्यातील दुरुस्त्या पूर्णपणे मागे घेण्यात याव्यात आणि हा कायदा मूळ स्वरूपात आणावा; अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा कूळ-मुंडकार संघर्ष समितीने दिला आहे. तसेच विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर न्यायालात या दुरुस्त्यांना आव्हान देण्यात येणार असल्याचे समितीकडून सांगण्यात आले. बार्देस शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गणेश गावकर, बोडगेश्वर शेतकरी संघाचे अध्यक्ष संजय बर्डे व इतर पदाधिकाऱ्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. (प्रतिनिधी)
कूळ, मूंडकार दुरुस्त्या कुणासाठी?
By admin | Published: July 26, 2015 2:42 AM