मडगाव : रायगडाला जेव्हा जाग येते यासारखे अजरामर नाटक प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक मा. दत्ताराम यांच्या खांद्याला खांदा लावून उभे केलेले या नाटकाचे सहदिग्दर्शक आणि शिक्षण क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ भिकू पै आंगले यांचे मंगळवार 20 फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांचे निधनसमयी वय 94 होते. रात्री झोपेत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे गोव्याचा माजी रणजीपटू असलेले पुत्र हेमंत, हरी तसेच विवाहित कन्या स्मिता गजानन सौदागर व अन्य परिवार असून, उद्या 21 फेब्रुवारी रोजी त्यांच्यावर मडगावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.नाट्य व शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिलेले आंगले यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1924 रोजी गोव्यात झाला होता. 1946 पासून त्यांनी महाराष्ट्रात शिक्षकीपेशात काम केले आहे. नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच. ए. एल. हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्यपदावरून ते 1981 साली निवृत्त झाले. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने 1973 साली आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविले होते. निवृत्त होऊन गोव्यात आल्यानंतर सुरुवातीला विद्याविकास महामंडळ आणि नंतर मठग्रामस्थ हिंदू सभा या दोन संस्थांच्या शैक्षणिक संस्थांशी ते कार्यरत होते. मठग्रामस्थ हिंदूसभेच्या दामोदर उच्च माध्यमिक विद्यालयाचे ते वयाच्या 90 व्या वर्षापर्यंत सल्लागार म्हणून सक्रिय काम करायचे.आंगले हे हाडाचे नाटककार होते. गोवा हिंदू असोसिएशन या गाजलेल्या नाट्यसंस्थेशी ते संलग्न होते. रायगड नाटक उभे करण्यास त्यांचे मोलाचे योगदान होते. 1997 साली पेडणे येथे भरलेल्या गोमंतक नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. लुकरे उदंड झाली, खडाष्टक, संगीत शारदा, रायगडाला जेव्हा जाग येते, सं. मत्स्यगंधा यांसारख्या अनेक नाटकांत भूमिका आणि दिग्दर्शन केलेले आंगले यांनी वयाच्या 76 व्या वर्षी पणजीत कला अकादमीत झालेल्या मानापमान नाटकात लक्ष्मीधराची शेवटची भूमिका करून आपल्या अंगावरील नाट्यालंकार खाली उतरविले होते. मराठीसाठी गोव्यात स्थापन केलेल्या गोमंतक मराठी अकादमी या संस्थेकडेही ते संलग्नित होते.
प्रसिद्ध नाट्यकर्मी व शिक्षणतज्ज्ञ भिकू पै आंगले यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 3:58 PM