पणजी : राज्यपाल म्हणून मेघालयाला नियुक्ती झाल्यानंतर सत्यपाल मलिक यांनी बुधवारी सकाळी आठ वाजताच गोव्याचा निरोप घेतला. सायंकाळी दोनापावल येथील राजभवनवर झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमावेळी भगत सिंग कोश्यारी यांना राज्यपाल म्हणून पद व गोपनियतेची शपथ देण्यात आली. कोश्यारी यांनी कोंकणीतून शपथ घेतली.कोश्यारी हे महाराष्ट्रातही राज्यपाल म्हणून काम पहात आहेत. त्यांना गोव्याचीही अतिरिक्त जबाबदारी दिली गेली आहे. दुपारी दीडच्या सुमारास कोश्यारी यांचे गोव्यात आगमन झाले. दाबोळी विमानतळावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. तत्पूर्वी सकाळी मलिक यांना दाबोळी विमानतळावर मुख्यमंत्री सावंत यांच्यासह मंत्री माविन गुदिन्हो, सभापती राजेश पाटणोकर व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी निरोप दिला. मलिक हे नौदलाच्या विमानाने मेघालयाला रवाना झाले. त्यांची नियुक्ती राज्यपाल म्हणून मेघालयाला झालेली आहे. कोंकणीतून शपथ घेणारे कोश्यारी हे पहिले राज्यपाल आहेत.दरम्यान, मलिक यांना केवळ दहा महिन्यांत गोव्याहून बदलीवर मेघालयाला पाठविण्यात आल्याबाबत समाजाच्या विविध घटकांनी टीका चालवली आहे. दोनापावल येथे नवे राजभवन बांधण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला मलिक यांनी हरकत घेतली होती. सध्या कोविड संकट काळात सरकारचे पूर्ण लक्ष कोविड व्यवस्थापनावर असावे तसेच राज्य आर्थिक संकटात असताना तूर्त मोठय़ा नव्या प्रकल्पांवर खर्च केला जाऊ नये, अशी अपेक्षा राज्यपाल मलिक यांनी व्यक्त केली होती. सरकारचे व सत्ताधारी भाजपचे मन त्यामुळे दुखावले होते. मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांशी अन्य काही विषयांवरून संघर्ष सुरू होता. या संघर्षाची परिणती मलिक यांच्या बदलीमध्ये झाली. तथापि, मलिक यांनी गोवा राज्य कायम आपल्या काळजात राहील असे बुधवारी रात्री जारी केलेल्या पत्रकातून स्पष्ट केले.
एसपी मलिक यांना निरोप, कोश्यारींनी स्वीकारली गोव्याच्या राज्यपालपदाची सूत्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 5:38 PM