पणजी - सुमूल डेअरीने दूध नाकारल्याने डिचोलीतील संतप्त शेतक-यांनी विधानसभेवर धडक देत निषेध म्हणून शेकडो लिटर दूध रस्त्यावर ओतले. ‘सुमूल’ने छळ चालूच ठेवला तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दुधाला चांगला दर मिळेल, असे आश्वासन देऊन पर्रीकर सरकारने काही वर्षांपूर्वी गुजरातची सुमूल डेअरी गोव्यात आणली होती.
सुमूल डेअरीने या शेतकºयांचे सुमारे ४ हजार लिटर दूध नाकारले. दुधाच्या चाचणीसाठी जी नवीन पध्दत वापरली त्याबद्दल ‘सुमूल’ने आपल्याला अंधारात ठेवल्याचे या शेतकºयांचे म्हणणे होते. दूध नाकारल्याने संतप्त बनलेले हे शेतकरी दुपारी ३.३0 च्या सुमारास दुधाचे कॅन घेऊन आले असता पर्वरी येथे विधानसभा संकुलापासून काही अंतरावर त्यांना पोलिसांनी अडविले.
गुजरातची सुमूल डेअरी राज्य सरकारच्या आशीर्वादानेच गोव्यात कार्यरत आहे. सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी शेतकºयांची मागणी आहे. दुध रस्त्यावर ओतण्यामागचे कारण विचारले असता या शेतकºयांनी असे सांगितले की, ‘सध्या विधानसभा अधिवेशन चालू असल्याने आमदारांना दूध भेट देण्यासाठी म्हणून आम्ही आणले होते. परंतु पोलिसांनी अडविल्याने नाइलाजाने जड अंत:करणाने ते रस्त्यावर ओतावे लागले.’
दुध उत्पादक मेघ:श्याम राऊत म्हणाले की, ‘दुध उत्पादनासाठी शेतकºयांना किती कष्ट घ्यावे लागतात हे लोकप्रतिनिधींना ठाऊक नसावे. ‘सुमुल’ ने दुधाच्या चाचणीसाठी जी पध्दत अवलंबिली त्याबद्दल आम्हाला अंधारात ठेवण्यात आले.’
आम्ही डेअरीला पाठवलेले दूध पात्रतेचे नव्हते तर प्रयोगशाळेत चाचणी करायला हवी होती. ती का केली नाही, असा सवाल राऊत यांनी केला व ‘सुमूल’ने असा छळ चालूच ठेवल्यास आंदोलन आणखी तीव्र करावे लागेल, असा इशारा दिला.
ते म्हणाले की, ‘दुधाला चांगला दर मिळेल, असे आश्वासन देऊन पर्रीकर सरकारने गुजरातची सुमूल डेअरी गोव्यात आणली होती. मात्र आता डेअरीचे अधिकारीच असा दावा करीत आहे की सरकारकडून त्यांना सहकार्य मिळत नाही. शेतकºयांचा बोनसही अडवून ठेवला आहे. पशूखाद्य महागले आहे त्यामुळे दुध उत्पादकांची आधीच ओढाताण होत आहे त्यात ‘सुमूल’ने छळ चालवल्याने दूध उत्पादक मेटाकुटीला आले आहेत.’
सुमारे २५ शेतकरी दुधाचे कॅन घेऊन आले होते. यात महिलांचाही समावेश होता, अशी माहिती पोलिस निरक्षिक विश्वेश कर्पे यांनी दिली.