अप्पा बुवा,फोंडा : संजीवनी साखर कारखान्याबाबत सरकारने कधीच ठोस भूमिका घेतली नाही. सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच अंधारात ठेवले. कारखाना बंद करताना तो कायमस्वरूपी बंद राहील असे सांगण्यात आले नव्हते. कारखाना बंद करताना ऊस उत्पादकांना विश्वासात घेतले नाही. इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचे गाजर दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आता शेतकऱ्यांचा संयम सुटत चांगला असून, याबाबतीत सरकारने नक्की काय ते सांगावे, अन्यथा दोन जानेवारीपासून कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गोमंतक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संघटनेने दिला आहे.
शुक्रवारी संघटनेची बैठक कारखान्याच्या आवारात झाली. बैठकीत ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई म्हणाले की, ‘गेल्या महिन्यात इथेनॉल प्रकल्पासंबंधी ठोस धोरण स्पष्ट करण्यासाठी सरकारला मुदत दिली होती. परंतु सरकारने अजून धोरण जाहीर केले नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. चार वर्षांपूर्वी कारखाना बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांना थातूरमातूर प्रस्ताव देण्यात आले. ऊस उत्पादन होणार नसल्याचे लक्षात येतात शेतकऱ्यांनी स्वतःच पुढाकार घेऊन इथेनॉल प्रकल्प सुरू करण्यासाठी काही कंपन्या सरकारच्या नजरेस आणून दिल्या. परंतु सरकारने चालढकल केली आहे. इथेनॉल प्रकल्प सुरू करण्यासाठी सरकारने सुविधा समितीची नियुक्त केली. त्या समितीलासुद्धा शेतकऱ्यांचे काहीच देणे-घेणे नाही. प्रकल्प सुरू करण्यासाठी कंपनी तयार असताना राज्य सरकार धोरण स्पष्ट करण्यास पुढे येत नाही.
२ जानेवारीपासून आंदोलन :
राजेंद्र देसाई म्हणाले की, ‘गेल्या काही वर्षात ऊस उत्पादकांना आंदोलनच करावे लागत आहे. राज्यातील काही भागात फक्त ऊस लागवड चांगल्या प्रमाणात होऊ शकते. त्यातून अनेक कुटुंबियांचा उदरनिर्वाह होईल. सरकार भूमिका स्पष्ट करीत नसल्याने ऊस उत्पादकांनी २ जानेवारीपासून कारखान्यासमोर धरणे आंदोलन सूरू करण्याचा निर्णय घेतला आहे.