पणजी: कथित अबकारी घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांना ईडी ने अटक केल्याच्या विरोधात तसेच त्यांना पाठिंबा देण्यासाठी पक्षाच्या गोव्यातील नेत्यांनी पणजी येथील आझाद मैदानावर एक दिवसीय लाक्षणीक उपोषण केले.
केजरीवाल यांच्यावरील कारवाई ही कुठल्याही पुराव्यांशिवाय असून सरकार लोकशाहीची हत्या करीत आहेत. केजरीवाल यांच्यावरील कारवाईचा तीव्र निषेध असून त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. सरकार समोर आम्ही झुकणार नसल्याचे यावेळी आप चे गोवा नेता ॲड. अमित पालेकर यांनी नमूद केले.
ॲड. पालेकर म्हणाले, की स्मार्ट सिटीच्या नावाखाली सरकार झाडे कापत आहे, लोकांना पोकळ आश्वासने देत आहेत. सरकारने लोकशाहीची थट्टा चालवली आहे. सांतिनेझ पणजी येथील जे वटवृक्ष कापण्यात आले, तेथे महिला वटपौर्णिमा साजरी करायच्या. मात्र हे वटवृक्ष कापण्याचा ना सरकारने, ना मुख्यमंत्र्यांनी व ना भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी निषेध केला. भाजप सनातन धर्माबाबत इतके बोलते. मग मुख्यमंत्री या विषयावर का गप्प आहेत? असा प्रश्न त्यांनी केला.