पणजी - राज्यातील युवा व महिलांनी मोठय़ा संख्येने मतदानात भाग घेतला. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात आणि तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये कडव्या लढती झाल्या आहेत. म्हापशात काँटे की टक्कर अनुभवास आली. मांद्रेमध्येही अत्यंत कडवी झुंज पहायला मिळाली. शिरोडामध्ये मगोपच्या तुलनेत भाजपचे सुभाष शिरोडकर किंचित वरचढ दिसले.
राज्यातील एकूण 1652 मतदान केंद्रांवरून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. सत्तरी, डिचोली, फोंडा, पेडणो अशा तालुक्यांमधील अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच युवा व महिला मतदारांची मोठी गर्दी दिसून आली. सकाळी दहा वाजल्यानंतर पुरुषांची गर्दी दिसून आली. तिसवाडीतील चिंबल, इंदिरानगर आदी भागांतील मतदान केंद्रांवरही सकाळपासूनच रांगा होत्या.
दुपारी तीन वाजेर्पयत उत्तर गोव्यात 58.31 टक्के मतदान झाले होते. उत्तरेत भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक आणि काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांच्यात तुल्यबळ लढत झाली आहे. 2014 च्या तुलनेत आता उत्तर गोव्यात काँग्रेसची मते खूप वाढतील पण भाजपचे संघटनात्मक बळ हे श्रीपाद नाईक यांच्या कामी आले. शिवाय नाईक यांचा संपर्कही मोठा आहे. त्यामुळे दक्षिण गोव्यासारखी उत्तरेत भाजपला निवडणूक जड गेलेली नाही. दक्षिण गोव्यातही भाजपने काँग्रेसला घाम काढला आहे. दक्षिण गोव्यात दुपारी तीन वाजेर्पयत 56.93 टक्के मतदान झाले होते. त्याचवेळी म्हापशात 56.37 टक्के, मांद्रेमध्ये 64.92 तर शिरोडय़ात 61.39 टक्के मतदानाची नोंद दुपारी तीन वाजेर्पयत झाले होते.
सायंकाळी पाच वाजेर्पयत राज्यात सरासरी 70.90 टक्के मतदानाची नोंद झाली होती. उत्तर गोव्यात 72.97 टक्के मतदान झाले. दक्षिण गोव्यात त्यावेळी तुलनेने कमी मतदान झाले होते. 68.90 टक्के मतदान दक्षिणोत झाले होते. मांद्रेमध्ये 75.99 टक्के, म्हापशात 75.17 तर शिरोडामध्ये 75.72 टक्के मतदान झाले होते. उकाडा मोठा असला तरी, अनेक पंचायत क्षेत्रंमधील मतदारांचा उत्साह कमी झाला नाही. मोठय़ा रांगा सगळीकडेच दिसून येत होत्या. दुपारी फक्त दीडच्या सुमारास अनेक केंद्रांवर मतदारांची कमी उपस्थिती दिसली पण बाकीच्यावेळी उपस्थितीत ब:यापैकी होती. वाळपई मतदारसंघातील काही केंद्रांवर सायंकाळी पाचनंतर महिलांच्या मोठय़ा रांगा दिसून आल्या.
ईव्हीएम यंत्रंमध्ये बिघाड (चौकट)
ताळगावमध्ये एका बूथवर प्रारंभी सुमारे चाळीस मिनिटे मतदान प्रक्रियाच झाली नाही. पहिले ईव्हीएम यंत्र बिघडले. त्याची बॅटरी निकामी झाली. मग दुसरे यंत्र आणले. ते सुरू होण्यासाठी विलंब झाला. मतदारांना बराचवेळ रांगेत ताटकळत रहावे लागले. पणजीतील फार्मसी कॉलेजमधील एका मतदान केंद्रातही ईव्हीएममध्ये प्रारंभी बिघाड झाला. मग ती समस्या दूर केली गेली. चिंबल येथेही ईव्हीएम यंत्र प्रारंभी सुरूच होईल. तिथे मतदारांची संख्या खूप असल्याने मतदान प्रक्रियेचा वेग कमी झाला होता.
कुंभारजुवे मतदारसंघातील खोर्ली पंचायत क्षेत्रतील 27 क्रमांकाचे मतदान केंद्र बरेच सजविले गेले होते. डिचोली व अन्य काही भागांतही पिंक मतदान केंद्र पहायला मिळाले. मतदान केंद्रांना रंग काढून तिथे विविध रंगांचे फुगे वगैरे लावण्यात आले होते. पाण्याची व्यवस्थित सोय मतदान केंद्रांवर होती. एखादा कर्मचारी किंवा मतदाराला जर भोवळ येऊ लागली किंवा अन्य काही समस्या निर्माण झाली, तर 1क्8 रुग्णवाहिका बोलावून पुढील उपचारांसाठी नेले जात होते. खांडोळा पंचायत क्षेत्रतील एका मतदान केंद्रावरील प्यूनला दुपारी भोवळ आली, त्याला 108 मधून उपचारांसाठी दवाखान्यात नेण्यात आले. पणजीतील आल्तिनो येथील मतदान केंद्रावर मतदारांची जास्त गर्दी नव्हती. तिथे व्यवस्थित मतदान प्रक्रिया सुरू राहिली.
सत्तरीत एकतर्फी स्थिती?
सत्तरी तालुक्यातील वाळपई मतदारसंघात आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांचेच समर्थक व कार्यकर्ते जास्त संख्येने फिरताना दिसत होते. वाळपईत 85 टक्के मतदान हे भाजपसाठीच असेल असा विश्वास मंत्री राणो यांनी व्यक्त केला. पर्येमध्ये 8क् टक्के मतदान भाजपसाठी असेल असे विश्वजित यांना वाटते. वाळपई व ऊसगावमध्ये भाजपला अनुकूल स्थिती होतीच. मंत्री विश्वजित यांनी वाळपई व पर्ये मतदारसंघात अनेक दिवस ठाण मांडून भाजपचे प्रचार काम केले होते. बार्देश तालुक्यात मात्र जास्त मतदान काँग्रेसच्याबाजूने झाल्याचा निष्कर्ष काढण्यासारखी स्थिती दिसून आली. कळंगुटमध्ये काँग्रेसला आघाडी असेल. शिवाय शिवोली व साळगावमध्येही काँग्रेसची मते बरीच वाढतील. म्हापशात भाजपला आघाडी मिळेल. तिसवाडीतही काँग्रेसला बरीच मते मिळतील हे स्पष्ट होत आहे.
दिव्यांगांसाठी खास सोय
पणजीत दिव्यांगांना मतदान केंद्रांवर नेऊन आणण्यासाठी विशेष टॅक्सीद्वारे व्यवस्थित सोय करण्यात आली होती. दिव्यांगांना विशेष टॅक्सींमधून मतदान केंद्रांवर आणण्यासाठी निवडणूक आयोगाने मान्यता दिली होती. त्याचा लाभ अनेक दिव्यांग मतदारांना झाला. दिव्यांग व्यक्ती इलेक्ट्रॉनिक यंत्रवर बटन स्वत:च दाबतात पण अनेकजण व्हीलचेअरवर बसून मतदान करत असल्याने इलेक्ट्रॉनिक यंत्र थोडे खाली असायला हवे असे त्यांना वाटते. कारण इलेक्ट्रॉनिक यंत्र उंचावर असल्याने दिव्यांग व्यक्तींना त्रस होतो. निवडणूक आयोगाच्या यंत्रणोने या समस्येची दखल घेण्याची गरज काही मतदारांनी व्यक्त केली.