पणजी : शंकर महादेवन यांच्यासारख्या मोठ्या गायक कलावंतासोबत काम करायला मिळाले हे माझे भाग्य आहे, अशा शब्दात दिग्दर्शिका दीप्ती सिवन यांनी आपले मत व्यक्त केले. सिवन कुटूंबियांपैकीच एक असल्यामुळे माझाही एक दिवस येईल, अशी आशा होती. इफ्फीत माझा चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे माझी ही इच्छा पूर्ण झाली असे त्या म्हणाल्या.
४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बुधवारी सिवन यांचा डिकोडिंग शंकर आणि प्रभल चक्रवर्ती यांचा संपूरक हा चित्रपट दाखविण्यात आला. या दोन चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी संयुक्त पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. नॉन फिचर फिल्म विभागात या दोन्ही दिग्दर्शकांचे चित्रपट इफ्फीमध्ये दाखवले.
चित्रपट निर्मिती ही शिक्षणातून नाही, तर तुमची आवड आणि ध्यास यातून जन्माला येते, असं मत डिकोडिंग शंकर या चित्रपटाच्या दिग्दर्शिका दीप्ती सिवन यांनी व्यक्त केलं. प्रसिद्ध गायक-संगीतकार शंकर महादेवन यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या निर्मितीविषयी त्यांनी माहिती दिली. शंकर महादेवन यांनी त्यांची आवड म्हणून संगीतसाधना केली असं सांगत, या चित्रपटातून आम्हाला हाच संदेश द्यायचा आहे की , तुमच्या आवडी, तुमची स्वप्ने पूर्ण करा, तुमचे शिक्षण काय आहे, याचा विचार करु नका. आपली आवड पूर्ण करण्याचा ध्यास घेतला तर यश आणि आनंद दोन्ही मिळेल, असं सिवन म्हणाल्या.
संतोष सिवन, संगीत सिवन, संजीव सिवन या माझ्या कुटूंबियातील सर्वजण इफ्फीत सहभागी झाले आहेत, आज मीही त्यांच्या पंक्तीत बसल्याचा मला अभिमान असल्याचे सिवन म्हणाल्या. प्रभल चक्रवर्ती यांनीही त्यांच्या संपूरक चित्रपटाबद्दल माहिती दिली. लघुपटाला इफ्फीमुळे मोठे व्यासपीठ मिळाल्याचे ते म्हणाले. येत्या काळात आणखी चांगले विषय मांडण्याचा प्रयत्न करु असेही ते म्हणाले.