- सद्गुरू पाटील
शिवाजीला देव करू नका, हे आम्ही हिंदू बांधवांना सांगायला हवे असे फादर बोलमॅक्स म्हणतात. शिवाजी हा राष्ट्रीय हिरो असेल तर त्याला राष्ट्रीय हिरोच माना, देव मानू नका... असे बोलमॅक्स वेगळ्याच त्वेषाने नमूद करतात. एवढेच नव्हे तर आपण तसे हिंदू बांधवांना सांगायला हवे असाही उपदेश ते करतात. बोलमॅक्स यांच्या चेहऱ्यावरील भाव यावेळी व्हीडिओमध्ये पाहण्यासारखे आहेत. मनातील राग चेहऱ्यावर दिसतो. उद्या समजा पूर्ण हिंदू समाजाने शिवरायांचा अपमान करणे सुरू केले तर कदाचित बोलमॅक्ससारखे काही ख्रिस्ती धर्मगुरु आनंदाने गावोगाव पेढे व मिठाई वाटतील. शिवाजीला थेट गोमंतकीयांच्या मनातून हद्दपार करता येत नसेल तर अप्रत्यक्षरित्या शिवरायांना कमी लेखण्याचा प्रयत्न करूया, अशी भूमिका बोलमॅक्स यांच्या विधानातून ध्वनित होते. हे खूप चिंताजनक, धक्कादायक व घातकही आहे.
छत्रपती शिवरायांना दैवत मानणारा समाज त्यांना देवच मानत राहील. दैवतांच्याच प्रतिमांचे पूजन केले जाते. त्यांच्या पुतळ्यासमोर, प्रतिमेसमोर कोट्यवधी लोक हात जोडतात. नतमस्तक होतात. युगप्रवर्तकासमोर नतमस्तक होणे हे समाज जीवंत आणि संवेदनशील असल्याची ग्वाही असते. महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, शिवाजी महाराज यांच्याविषयी नितांत आदर असलेला भारतीय समाज चारही बाजूंनी समजून घ्यावा लागेल. शिवरायांचा फोटो जसा घराच्या हॉलमध्ये असतो, तसाच तो काहीजणांच्या देव्हाऱ्यातदेखील असतो. मनाच्या गर्भकुडीतही असतो. उगाच लोक शिवरायांना डोक्यावर घेत नाहीत. त्यामागे तसा इतिहास आहे. पराक्रम व साहस, वीरता व शौर्य, त्याग आणि स्वदेशप्रेम, युद्धकौशल्य आणि गनिमी कावे, स्वराज्यासाठी, राजासाठी जीव देणारे मावळे आणि जीवघेण्या लढाया हे सगळे शिवरायांनी अनुभवले होते. आक्रमकांचे अत्याचार परतवून लावत आपले सारे जीवनच भूमीसाठी अर्पण केलेले ते युगपुरुष ठरले.
गोव्यात काहीजण शिवरायांना सुरुवातीपासून टोमणे मारतात. त्यांचा हेतू वेगळा असतो. शिवरायांच्या मावळ्यांमध्ये मुस्लिम बांधवदेखील होते, असे काही गोंयकार सांगतात. पण त्याचवेळी ते छत्रपतींचा अपमानदेखील करण्याची संधी सोडत नाहीत, असे अलिकडे वारंवार दिसून येऊ लागले आहे. शिवरायांनी दुसऱ्या धर्मातील व्यक्तींवर अन्याय केला नाही असे जे सांगतात, त्यांनाच मग शिवरायांची अॅलर्जी का? उलट कथित सेक्युलर व्यक्तींना छत्रपतींचे जास्त आकर्षण वाटायला हवे, कारण शिवरायांच्या सैन्यात सर्व धर्माचे लोक होते, असे तेच तर सांगतात.
छत्रपतींचा पुतळा गोव्यात एखाद्या ठिकाणी उभा झाला किंवा काही युवकांनी शिवजयंती जोशात साजरी केली तर अशा युवकांना दोष का द्यायला हवा? आदर्श व्यक्तींचे स्तोम जर समाजाच्या कल्याणासाठी कुणी माजवत असेल तर त्यास आक्षेप का? गोवा मुक्तीनंतर आता साठ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आपल्याला दुधासह भाजी आणि अंड्यांसह कडधान्ये वगैरे सगळेच बाहेरून आणावे लागते. शाकाहारासह मांसाहार असे आपले सगळे अन्नच बाहेरून येते. येथे सांगायचा हेतू असा की एक राज्य दुसऱ्या राज्यावर अवलंबून राहणे हे विविध बाबतीत घडत असते. एखादा महापुरुष किंवा दैवतासमान एखादे व्यक्तिमत्त्व दुसऱ्या राज्यात जन्मले म्हणून त्या महापुरुषास दोष देणे किंवा त्याचे अवमूल्यन करण्याचा प्रयत्न करणे हे कोणत्या धर्मात किंवा कोणत्या विचारसरणीत बसते?
रस्त्यावर अडथळा ठरेल किंवा अपघातास कारण ठरेल अशा ठिकाणी पुतळा उभा राहू नये हा मुद्दा योग्य आहे. मात्र लोक भक्तिभावाने योग्य त्या ठिकाणी जर छत्रपतींचे पुतळे उभे करत असतील तर त्याविरुद्ध कारवाया करण्याचा अधिकार कुणालाच राहत नाही. आज कालच्या राजकीय नेत्यांचे पुतळे उभे करण्यापेक्षा छत्रपतींचे पुतळे व प्रतिमा उभे करणे हे कधीही चांगलेच ठरेल.
फादर बोलमॅक्स परैरा यांनी छत्रपतीविषयी जे विधान केले, ते काही पहिलेच नव्हते. यापूर्वीही ख्रिस्ती व हिंदूंमधील काही ठरावीक व्यक्तींनी शिवाजी महाराजांविषयी भलती सलती विधाने केल्याची उदाहरणे आहेत. शिवाजी महाराजांचे गोव्याशी काही देणेघेणे नव्हते, आम्ही कशाला त्यांची जयंती साजरी करावी असा प्रश्न एक-दोन गोंयकार लेखकांनी यापूर्वी विचारल्याची धक्कादायक उदाहरणे आहेत. गोव्याशी असलेल्या शिवरायांच्या संबंधांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणे किंवा शिवाजी, मराठी भाषा, मराठी संस्कृती याविरुद्ध जाणूनबुजून अपमानास्पद भूमिका घेणे ही फैशन गेल्या चाळीस वर्षातील आहे.
हिंदू धर्मियांमधील अनेकजण आता छत्रपतींचा अपमान सहन करत नाहीत, त्यामुळेच फादर बोलमॅक्स यांना आपली चूक कळून आली. फादर बोलमॅक्स यांनी स्वतःच्या विधानांविषयी खेद व्यक्त केला. माफीची भूमिका घेतली. कारण गोव्यातील बहुतांश लोक आता यापुढे छत्रपतींचा अपमान सहन करणार नाहीत, हे फादर बोलमॅक्स व इतरांना कळून आले आहे. एक-दोन विरोधी आमदारांनाही ते कळून आले आहे. त्यामुळे एका आमदाराचीही भूमिका बदलली. छत्रपतींवर भक्ती असलेले अनेक गोमंतकीय तरुण आता रस्त्यावर उतरू लागले आहेत. ते जाब विचारू लागले आहेत. त्यामुळेच काहीजण आता आपली विधाने मागे घेऊ लागले आहेत. वास्को पोलिसांनी फादर बोलमॅक्स यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. लोक जागे झाले आहेत. यामुळे पोलिसांनाही कारवाई करावी लागली. कळंगुट पंचायतीसमोरही अलिकडेच गोमंतकीय तरुणांनी आपली शक्ती दाखवली होती. त्यामुळे तेथील सरपंच जोझफ सिक्वेरा यांना भूमिका बदलावी लागली होती. अगोदर अपमान करायचा व मग आपण देखील शिवरायांचा आदर करतो असे सांगायचे हा ढोंगीपणा झाला. हे कुठे तरी थांबायला हवे. गोव्यातील धार्मिक सलोखा सर्वांनी मिळून टिकवून ठेवायलाच हवा. फक्त ठरावीक व्यक्तीनी छत्रपतींचा अपमान करणे बंद केले तर सलोखा अधिक चांगल्या प्रकारे टिकून राहू शकेल.
सध्या वाढलेली महागाई, वाढती बेरोजगारी याविरुद्ध गोमंतकीय युवकांनी रस्त्यावर यायला हवे असा सल्ला काहीजण अगदी साळसूदपणे देत आहेत. युवकांना नोकऱ्यांची अपेक्षा आहेच. बेरोजगारी व महागाईविरुद्ध देखील युवक बोलतातच. लोकांना त्याविषयीही चिड आहेच, पण याचा अर्थ असा नव्हे की सातत्याने शिवाजी महाराजांचा अपमान सहन करत राहावे व युवकांनी त्या अपमानाविषयी काही बोलूच नये. जर महागाई व बेरोजगारी याबाबतच बोलायचे झाले तर मग जगातील अन्य कोणत्याच विषयांवर आजच्या मुलांनी बोलूच नये किंवा कृती करूच नये असा अर्थ होईल. आई-वडिलांचा अपमान झाला तरी गप्प राहावे, कारण बाजूला महागाई वाढलीय, बेरोजगारी वाढलीय असा युक्तिवाद करता येईल.