- अजय बुवा पणजी : काही अपत्ये जन्मत:च दिव्यांग असतात. जन्मदात्यांसाठी तो पोटचा गोळा असतो. त्याला ते जिवापाड जपतात. त्याच्या संगोपनासाठी ते मग कुठलीही कसर ठेवत नाहीत. आपल्या दिव्यांग मुलीसाठी फोंड्यात एकाने चक्क ‘रोबोटकाका’ बनविला. दत्तगड-बेतोडा,फोंडा येथे दहा बाय दहाच्या झोपडीवजा भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या बिपीन कदम यांची ही कथा. सतरा वर्षांपूर्वी जन्मलेली प्राजक्ता जन्मताच दिव्यांग आहे. जन्माला आल्यापासून खाट हेच तिचे जीवन. तिला उचलून नेऊन आंघोळ घालायची, तिला जेवायला भरवायचे हे सर्वकाही कदम दाम्पत्य आनंदाने करीत आहेत. मूळचे कुडाळचे बिपीन फक्त दहावी शिकलेले आहेत. या रोबोटला चमचा आहे. रोबोटच्या खाली तीन बशा ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये भात, वरण व भाजी ठेवली जाते. रोबोटला एक माईक जोडलेला आहे. त्या माईकमध्ये मुलीने भात असे म्हणतात तो चमचा भात असलेल्या बशीत जातो. अलगद एक घास उचलून तो त्या मुलीच्या तोंडात ठेवतो. मुलीला भात-वरण कालवून हवे असेल तर तो रोबोट तेपण काम करतो. साडेबारा हजारांत रोबोट तयार करायला फक्त साडेबारा हजार रुपये खर्च आला आहे. दिव्यांग असलेली असंख्य मुले आमच्या आवतीभोवती आहेत. त्या मुलांना मायेने घास भरविणारे अनेक रोबोट त्यांना तयार करायचे आहेत. गोव्यातल्या काही मंत्रीमहोदयांना ते भेटले आहेत. एका केंद्रीय मंत्र्यांपर्यंत त्यांनी आपला रोबोट नेला. परंतु सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.
बापमाणूस! दिव्यांग मुलीसाठी जन्मदात्याने बनविला चक्क ‘रोबोटकाका’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 7:03 AM