समीर नाईक, पणजी (गोवा): एफसी गोवा यंदाच्या आयएसएल हंगामसाठी पूर्णपणे सज्ज आहे. आमच्याकडे विदेशी, भारतीय आणि स्थानिक खेळाडू असलेले चांगला संघ आहे. नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता घेऊन मैदानावर उतरणार आहोत. त्यामुळे आम्ही आयएसएल चषकाचे प्रबळ दावेदार असणार आहोत, असे मत एफसी गोवाचे प्रशिक्षक मनोला मार्केझ यांनी व्यक्त केले.
पणजीत आयएसएल हंगामच्या पार्श्भूमीवर एफसी गोवा तर्फे पत्रकार परिषद आयोजित केली होती, यावेळी एफसी गोवाचे सीईओ रवी पुष्कर, प्रशिक्षक मनोला मार्केझ, कर्णधार ब्रँडन फर्नांडिस, व इतर खेळाडू उपस्थित होते.
कोच म्हणाले, "गेल्या दोन वर्षातील आयएसएलमधील आमची कामगिरी चांगली नव्हती, पण प्रत्येक हंगाम हा नवीन असतो, त्यामुळे मागचे सर्व वाईट गोष्टी विसरून यंदा नव्या धोरणासह मैदानावर उतरणार आहोत. यासाठी आवश्यक प्रशिक्षण खेळाडूंना देण्यास आम्ही सुरुवात केली आहे. संघातील प्रत्येक खेळाडूवर आम्ही भर दिला आहे. वैयक्तिकरित्या आम्ही या खेळाडूंना शारीरिक आणि मानसिदृष्ट्या सुदृढ करण्याचे काम केले आहे, त्यामुळे यंदा संघाचा चांगला खेळ समर्थकांना दिसणार आहे, असे मार्केझ यांनी यावेळी सांगितले. एका प्रश्नाला उत्तर देताना मार्केझ यांनी सांगितले की विदेशी खेळाडू, आणि स्थानिक खेळाडू यांच्या स्ट्रेंथ मध्ये खूप फरक दिसून येतो, पण गेल्या वर्षभरात यावरही आम्ही काम केले असून यातून स्थानिक खेळाडूंचा स्ट्रेंथ अधिक पटीने वाढला आहे. याचा फायदा आम्हाला होणार आहे."
"फॅन्सच्या पाठिंब्यामुळे घरेलु मैदानावर आम्ही आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे, पण आता इतर मैदानावर देखील अशीच कामगिरी करण्यावर आमचा भर असणार आहे. शेवटी या सर्व गोष्टी संघातील प्रत्येक खेळाडूवर अवलंबून आहे. भारतीय संघातून खेळण्याचा अनुभव कामी येईल. ब्रँडन फर्नांडीस देशाचे प्रतिनिधित्व करणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते, याबाबतीत मी खूप भाग्यवान आहे. गेल्या काही वर्षात भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूसोबत खेळताना खूप काही शिकता आहे. हा संपूर्ण अनुभव आयएसएलमध्ये कमी येणार आहे, असे एफसी गोवाचा कर्णधार ब्रँडन फर्नांडीस यांनी यावेळी सांगितले. कर्णधार म्हणून माझ्याकडे मोठी जबबदारी आहे, पण कर्णधार हा फक्त टॅग आहे, माझ्यासोबत या संघात माझ्यापेक्षा अनुभवाने श्रेष्ठ खेळाडू आहेत, त्यामुळे त्याचे सल्ले मोलाचे ठरतात. आज मी कर्णधार आहे, उद्या आणि कोण असू शकतो, या गोष्टी चालत राहतात, पण कामगिरीत सातत्य ठेवण्यावर आणि संघातील प्रत्येक खेळाडूला सोबत घेऊन जाण्यावर माझा भर असणार आहे", असेही फर्नांडीस यांनी यावेळी सांगितले.