लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळाबाहेर उघड्यावर खाद्य पदार्थ तयार करून विकणाऱ्या गाड्यांवर कालपासून गंडांतर आले. आरोग्यास अपायकारक अशा वातावरणात खाद्य पदार्थ तयार करू नये म्हणून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई मोहीम हाती घेतली आहे. अनेक ठिकाणी ही मोहिम यापुढे राबवली जाणार आहे.
एफडीएच्या संचालक ज्योती सरदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, कारवाई चालूच राहील. एचडीएचे अधिकारी रिचर्ड नोरोन्हा यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी विश्वासराव राणे, नौसीन मुल्ला, सोनल गोवेनकर आणि आत्माराम नाईक या पथकाने गोवा मेडिकल कॉलेज जवळ असलेल्या खाद्यपदार्थाच्या गाड्यांची पाहणी केली.
स्टॉलवर अस्वच्छ स्थितीत अन्न तयार करण्याचे काम करताना आढळून आले. समोसे, पकोडे, ऑम्लेट यांसारखे पदार्थ तयार करून सांडपाणी आसपासच्या भागात सोडले जात होते. काही महिन्यांपूर्वी या दुकानांची तपासणी करण्यात आली होती आणि दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला होता; तरीही त्यांनी कोणतीही सुधारणा न करता काम सुरू ठेवले. त्यामुळे अन्न सुरक्षा आणि मानक कायदा २००६ च्या कलम २ अन्वये ३ गाड्यांवर प्रत्येकी १० हजार व २ गाड्यांवर प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. अन्न तयार करण्याचे सर्व उपक्रम थांबवण्याचे निर्देश देण्यात आले अजून स्वच्छतेसाठी आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्यास बजावले आहे. त्यांनी असा गुन्हा पुन्हा केल्यास त्यांची नोंदणी निलंबित किंवा रद्द केली जाईल. इतर काही दुकानांचीही तपासणी करण्यात आली आणि नोटीस बजावण्यात आली.
माध्यान्ह आहारात अळ्या सापडल्यानंतर खात्याने त्याची गंभीर दखल घेतलेली आहे. आहाराचे नमुने तपासणीसाठी घेऊन संबंधित वेल्फेअर ग्रुपचा परवाना निलंबित केलेला आहे. नमुने तपासणी अहवाल लवकरात लवकर द्यावा, असे निर्देश प्रयोगशाळेला देण्यात आलेले आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
टेबलखाली कुत्रे
अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक पाहणी करण्यासाठी गाड्यांजवळ गेले असता हे। गाडे अत्यंत अस्वच्छ असल्याचे आढळून आले. लोकांना खाण्याची व्यवस्था ज्या टेबलवर करण्यात येते त्या टेबलखाली कुत्रे झोपलेलेही आढळून आले.
यांना ठोठावला दंड
- विकी हावनूर, स्टॉल क्रमांक चार १० हजार- राजन रेडकर स्टॉल क्रमांक एक यांना १० हजार- बाबलो हळदणकर स्टॉल क्रमांक ९८ यांना १० हजार- लता पिलामार स्टॉल क्रमांक ११ ला ५ हजार- आश्विनी माळगावकर स्टॉल क्र. १५ ला ५ हजार रुपये दंड त्रास द्यायचा हेतू नाही, पण....
एफडीकडून तपासणीचे काम हाती घेतले जाईल. रेस्टॉरंटपासून स्वयंसहाय्य गटांपर्यंत व गाड्यांपासून मोठ्या हॉटेलांच्या स्वयंपाक गृहापर्यंत ज्या-ज्या आस्थापनाविषयी तक्रार येते, त्या-त्या ठिकाणी जाऊन तपासणी केली जाईल. एफडीएच्या अधिकार क्षेत्रात जे जे येते ते केले जाईल. कारण विद्यार्थी असो किंवा अन्य ग्राहक असो, त्यांना चांगलेच अन्न पदार्थ मिळायला हवेत. अपायकारक खाद्य पदार्थ कुणी विकू नयेत. माध्यान्ह आहार पुरविणाऱ्या सेल्फ हेल्प गृपबाबत तक्रार आली तर त्यांच्याही किचनची तपासणी केली जाईल. रेस्टॉरंटचे वगैरे परवाने निलंबित केले जातील. मात्र हे करताना उगाच कुणाची सतावणूक करू नये, असेही मी एफडीएला सांगितले आहे. - विश्वजित राणे, अन्न व औषध प्रशासन मंत्री