लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील ८० टक्के अपघात मद्यपान करून वाहने चालवल्याने होतात. आता सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बस चालकांची अल्कोमीटरद्वारे तपासणी केली जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले. वाढत्या रस्ता अपघातांबद्दल चिंता व्यक्त करून 'भिवपाची गरज आसा', असेही मुख्यमंत्री म्हणाले.
येथील डॉन बॉस्को हायस्कूलच्या सभागृहात सोमवारी आयोजित १३ व्या रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, वाहतूक खात्याचे संचालक आयएएस अधिकारी प्रविमल अभिषेक, खात्याचे वरिष्ठ अधिकारी डी. एस. सावंत, संदीप देसाई, वाहतूक पोलिस अधीक्षक प्रबोध शिरवईकर, फादर काव्हलो आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात दर दिवशी अपघातात किमान एक ठार व दहाजण जखमी होऊन इस्पितळात पोहोचतात. पोलिसांनी पकडले की, काहीजण राजकारण्यांना फोन करतात. मलाही अनेक फोन येतात. परंतु असा फोन कोणी जर केला तर मी त्यांना आधी दंड भरा, असे सांगतो. कोविडच्या काळात मी लोकांना 'भिवपाची गरज ना', असे सांगत होतो. परंतु रस्ता अपघातांची संख्या एवढी वाढली आहे की, खरोखरच ती मोठी चिंतेची बाब बनली आहे आणि आता अपघातांच्या बाबतीत तरी 'भिवपाची गरज आसा' असेही ते म्हणाले. यावेळी शाळकरी मुलांसाठी घेतलेल्या स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
दरम्यान, शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीचे नियम व अपघात टाळण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. पुढील सप्ताहभरात सरकारतर्फे राज्यात ठिकठिकाणी असे उपक्रम राबवले जाणार आहेत. लोकांची सुरक्षा हे सरकारसाठी प्राधान्य आहे. अपघात कमी करण्यासाठी सरकार आवश्यक ते सर्व प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.
नाइट व्हिजन कॅमेरे' बसवणार
वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनीही राज्यातील वाढत्या अपघातांबद्दल चिंता व्यक्त केली. गोव्याची ओळख आता अपघातांचे राज्य, अशी होऊ लागली आहे. लोकांनी अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळायला हवेत. रेंट ए कार घेऊन फिरणाऱ्या पर्यटकांना येथील रस्त्यांची माहिती नसते, त्यामुळेही अपघात होतात. राज्यभरात लवकरच सर्वत्र 'नाइट व्हिजन कॅमेरे' बसवण्याची योजना आहे. अपघात कमी करण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे.
...तर मद्यपानावेळी चालकाला सोबत घेऊन जा
युवकांमध्ये वेगाची नशा आहे. मॉडिफाईड दुचाक्या उडविताना इतरांचे जीव घेतले जातात. मद्यपान करून वाहन चालवणे, वाहन हाकताना मोबाइल वापरणे यामुळे अपघात घडतात. काही युवक दुचाकी वेगाने हाकून स्टाइलही मारतात त्यामुळेही अपघात होतात. ज्यांना मद्यपान करायचे असेल त्यांनी ते घरीच करावे. बारमध्ये जात असाल तर सोबत ड्रायव्हर घेऊन जा. मद्यपान करून बेदरकारपणे वाहने हाकून निष्पाप लोकांचे बळी घेऊ नका, असेही सावंत म्हणाले.