वास्को: गोव्यात आलेले पर्यटक जोडपे बुधवारी (दि.१५) दाबोळी विमानतळावरून दिल्लीला जाण्यासाठी दुचाकीवरून येताना वेर्णा महामार्गावर झालेल्या अपघातात पत्नी जागीच ठार झाली तर पती जखमी झाल्याने त्याच्यावर इस्पितळात उपचार चालू आहे.
पूर्व पटेलनगर, दिल्ली येथे राहणारा २८ वर्षीय प्रनभ मलिक त्याची पत्नी प्रिती आर्या (वय २६) हीला घेऊन दुचाकीने येताना रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या चारचाकीला धडक दिली. त्या अपघातात प्रिती रस्त्यावर पडली असून तेव्हाच त्याच मार्गाने जाणारी टॅक्सी चारचाकी तिच्या अंगावरून गेल्याने ती जागीच ठार झाली.
वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास तो अपघात घडला. दिल्ली येथे राहणारे प्रनभ आणि प्रिती हे पर्यटक जोडपे १० नोव्हेंबरला गोवा फिरण्यासाठी आले होते. गोवा फिरण्यासाठी तेव्हा त्यांनी सेल्फ दुचाकी भाड्याने घेतली होती. पाच दिवस गोवा दर्शन केल्यानंतर बुधवारी दुपारी दाबोळी विमानतळावरून त्यांचे दिल्लीला जाण्यासाठी विमान असल्याने प्रनभ आणि प्रिती भाड्याने घेतलेल्या सेल्फ दुचाकीवरून दाबोळीवर येत होते. पत्नीला घेऊन प्रनभ दुचाकीने येताना तो वेर्णा महामार्गावर (जुआरी इंडीयन ऑईल टॅंकीग व्यवस्थापनाच्या बाहेरील रस्त्यावर) पोचला असता तेथे चाक ‘पंक्चर’ झाल्याने रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या ‘व्हॅगनार’ चारचाकीला प्रनभ चालवत असलेल्या दुचाकीने धडक दिली. त्या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेली प्रिती रस्त्यावर पडली. त्याचवेळी वेर्णा महामार्गावरून दाबोळी विमानतळाच्या दिशेने जाणारी टॅक्सी ‘इनोव्हा’ चारचाकी प्रितीच्या अंगावर चढली. त्या अपघातात प्रितीचा जागीच अंत झाल्याची माहीती पोलीसांनी दिली.
प्रितीच्या अंगावर चढलेली ती टॅक्सी चारचाकी अपघातावेळी आसोल्णा येथील फ्रांन्सीस मास्कारेनस नामक चालक चालवत होता अशी माहीती पोलीसांनी दिली. त्या अपघातात प्रनभ जखमी झाल्याने त्याला बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात उपचारासाठी पाठवले असून त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहीती पोलीसांकडून मिळाली. वेर्णा पोलीसांनी अपघाताचा आणि मयत प्रिती च्या मृतदेहाचा पंचनामा करून तो शवगृहात पाठवून दिला आहे. वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.