संदीप आडनाईकपणजी : मोजक्याच, पण दर्दी चाहत्यांच्या उपस्थितीत गोव्यात ४८ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे. चौथ्या दिवसापर्यंत ३६ देशांचे ११६ चित्रपट दाखविण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या इफ्फीमध्ये नोंदणी करणारे प्रतिनिधी आणि प्रत्यक्ष उपस्थित राहणाºया प्रतिनिधींमध्ये तफावत आहे, हे प्रत्यक्ष दिसून येते. इफ्फीअंतर्गत असलेल्या चित्रपटगृहांमध्ये रोज दाखविण्यात येणाºया चित्रपटांसाठी मोजकेच आणि दर्दी चित्रपट रसिकच हजेरी लावताना दिसत आहेत.
नेहमीप्रमाणे रेट्रो विभागात दाखविण्यात येणा-या प्रादेशिक भाषेतील चित्रपटांना यंदा स्थानिक प्रतिनिधींनी रुची दाखविली असली तरी जगभरातील वेगवेगळ्या भाषांतील चित्रपटांना बाहेरून आलेल्या रसिकांची विशेष पसंती आहे. ब्रिक्स विभागांतर्गत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशातील चित्रपटांचा समावेश आहे. त्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद आहे. जगभरातील ८२ देशांतील १९५ चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येत आहेत. यामध्ये इंडियन पॅनोरमा, जागतिक सिनेमा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी असणाºया चित्रपटांचा समावेश आहे. यंदा जेम्स बॉण्ड या पात्राभोवती फिरणा-या चित्रपटांची त्याच्या चाहत्यांसाठी विशेष पर्वणी आहे. याशिवाय १९६0 ते २0१२ या कालावधीत प्रदर्शित झालेल्या काही दर्जेदार आणि क्लासिक चित्रपटांनाही त्यांचा चाहतावर्ग गर्दी करत आहे. इतकेच नव्हे तर तरुण वर्गाची उपस्थितीही त्या चित्रपटांना असते, हे विशेष.
पहिल्या दिवशी इराणी दिग्दर्शक माजिद माजिदी यांचा उद्घाटनाचा चित्रपट बहुतेक प्रतिनिधींना पाहायला मिळाला नाही. हा चित्रपट आणखी एकदा दाखविण्याची मागणी आहे. दुसºया दिवशी ३६, तिसºया दिवशी ४0 तर चौथ्या दिवशी ३९ चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात आले.
भारतीय भाषेतील चित्रपटांची हजेरी हे इंडियन पॅनोरमाचे वैशिष्ट्य. यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सुमित्रा भावे आणि सुनील सुखठणकर या जोडीच्या ‘कासव’ या चित्रपटासह हिंदी, आसामी, बंगाली, ओडिसी, तमिळ, तेलगू आणि कोकणी चित्रपटांचा मनमुराद आनंद भारतीय प्रेक्षकांसोबतच परदेशी चित्रपट रसिकांनी घेतला.चित्रपट महोत्सव हे चित्रपट निर्मात्यांसोबत संवाद साधण्याचे थेट माध्यम आहे. निर्मात्यांचे चित्रपट तयार करण्यामागचे परिश्रम कोणी विचारात घेत नाही. त्यांच्याशी याबाबत थेट बोलण्याची संधी अशाप्रकारच्या महोत्सवात मिळते.- मधुर भंडारकर, चित्रपट दिग्दर्शक