प्रसाद म्हांबरे, लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा: खिश्चन तसेच बहुजन समाजाचे प्रभुत्व असलेल्या उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात सतत ५ वेळा भाजपला आघाडी मिळवून देणारा बार्देश हा तालुका. मात्र गेल्या दोन निवडणुकीपासून तालुक्यातून भाजपची आघाडी घटण्यास सुरुवात झाली आहे.
घटलेल्या आघाडीतून पुन्हा सहाव्यांदा आपले प्रभुत्व पुन्हा सिद्ध करण्याच्या तयारीला भाजप लागला आहे. दुसऱ्या बाजूने काँग्रेस विधानसभा, तसेच मागील लोकसभा निवडणुकीत भाजपावर झालेल्या परिणामांची पुनरावृत्ती घडवून भाजपसमोर नवी आव्हाने उभी करण्याची तयारी या पक्षाकडून सुरू केली आहे. मात्र, या दोन्ही पक्षांना आरजीच्या कडव्या प्रतिकाराला तोंड घ्यावे लागणार आहे.
सात मतदारसंघ असलेल्या या तालुक्यातील ६ मतदारसंघ भाजपकडे तर एकमेव हळदोणा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाकडे आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यातील तीन आमदारांनी पक्षांतर केल्याने तालुक्याची पूर्ण जबाबदारी पक्षाचे एकमेव आमदार कार्लस फरेरा यांच्या खांद्यावर पडली आहे. विधानसभेवेळी ताकद दाखवणारा रिव्होल्यूशनरी गोवन्सने (आरजी) आता लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपाविरुद्ध काँग्रेस असे चित्र असलेल्या तालुक्यात दोन्ही पक्षांना आरजीच्या कडव्या प्रतिकाराला तोंड घ्यावे लागणार आहे. कळंगुट मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असूनही सलग दोनवेळा लोकसभेवेळी तो काँग्रेसच्या बाजूला राहिला आहे.
भाजपची लागणार कसोटी
ख्रिश्चन मतदारांचा प्रभाव असलेल्या हळदोणातून भाजपची आघाडी २०१९ त कमी झालेली. त्यावेळी भाजपला फक्त ५३७ मतांची आघाडी लाभली होती. शिवोली मतदारसंघातही भाजपला फक्त ५९८ मतांची आघाडी लाभली होती. म्हापशात भाजपला ३४४१ मते प्राप्त झाली असली तरी तुलनेत मतांची संख्या घटली होती. साळगाव मतदारसंघात २४८४, पर्वरी मतदारसंघात ३९२३ तर थिवीतून २४२५ मतांची आघाडी प्राप्त झाली होती.
भाजपकडून चौघे, काँग्रेसकडून दोन दावेदार
विद्यमान खासदार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या सोबत दिलीप परुळेकर, दयानंद मांदेकर तसेच दयानंद सोपटे यांनी भाजपच्या उमेदवारीवर दावा केला आहे. काँग्रेसच्या वतीने माजी केंद्रीयमंत्री अॅड. रमाकांत खलप तसेच सरचिटणीस विजय भिके या दोन उमेदवारांच्या नावाची शिफारस पक्षाजवळ केली आहे.
सात आमदारांपैकी तीन ख्रिश्चन समाजातील
भाजपचा गड मानला जाणाऱ्या या तालुक्यात ख्रिश्चन तसेच बहुजन समाजाचा प्रभाव असलेला हा तालुका आहे. विद्यमान ७ आमदारांतील ३ आमदार हे ख्रिश्चन समाजातील आहेत. २०१४ च्या तुलनेत २०१९ साली भाजपचे प्रभुत्व तालुक्यातून बरेच घटले होते. लोकसभेच्या वेळी घटलेल्या मतांचे परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून आले होते. त्यानंतर बार्देशातून काँग्रेस उमेदवारीवर निवडून आलेल्या आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता. त्याचेही पडसाद लोकसभेवर उमटण्याची शक्यता आहे.
कोपरा बैठकांचे सत्र सुरू
या दोन्ही पक्षांना आरजीचे प्रमुख मनोज परब रिंगणात उतरणार हे निश्चित झाल्याने त्यांच्या कडव्या प्रतिकाराला तोंड देण्याची पाळी येणार आहे. प्रचाराचे वातावरण तयार करण्यास आघाडी घेतलेल्या भाजपने विकसित भारत संकल्प यात्रेतून आरंभ केला आहे. दुसच्या बाजूने काँग्रेस पक्षाने गट स्तरावर बैठकांचे सत्र आरंभले आहे. तसेच आरजीकडूनही मतदारांना भेटण्याचे सत्र आरंभले आहे.
मतदारांसमोर पर्याय कुठलाही पक्ष असो प्रत्येक पक्षाला सत्ता हवी. पक्षाने दिलेल्या उमेदवाराची पार्श्वभूमी काहीही असली तरी निवडून येणे हा एकमेव उद्देश आहे. दोन्ही पक्षाचे उमेदवार या धर्तीवर ठरवले जातात. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांना काय हवे, याचा विचार मतदारांनी करण्याची वेळ आली आहे. म्हादई प्रश्न, खाण व्यवसाय प्रश्न, कोळसा प्रश्न तसेच इतर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर भाजपला आपली भूमिका मांडणाऱ्या नेत्याची गरज आहे. भाजप २५ वर्षे सत्तेवर असताना त्यांनी काय केले हे दाखवण्याची वेळ आली आहे. सध्या संघटनात्मक कार्य तसेच योग्य नेतृत्व नसलेल्या काँग्रेसलाही आपली भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आली आहे. लोकांच्या भावना लोकसभेत मांडणाऱ्या नेत्याची सध्या गरज आहे. - अॅड. महेश राणे, राजकीय विश्लेषक, म्हापसा.