लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: दक्षिण गोव्यात लोकसभा निवडणुकीत भाजप व काँग्रेस उमेदवार प्रचारासाठी जोर लावला आहे. जिल्ह्यात या दोन्ही पक्षांचा प्रचार जोरदारपणे सुरू आहे. दोघेही विजयाची खात्री देत असले तरी अंडरकरंटचाही धोका आहे. मतदार सावध आहेत. पल्लवी धंपे आणि विरियातो फर्नाडिस यांच्यातील लढत उत्कंठा वाढविणारी ठरत आहे.
वाढती महागाई, बेरोजगारी हे प्रश्नही आहे. खुलेआम त्यावर बोलायला मतदार पुढे येत नसला तरी आपला राग ते मतदानाच्या वेळी काढू शकतात. सध्याच्या घडीला तरी या जिल्ह्यात दोन्ही पक्षांत कडवी झुंज आहे.
दक्षिण गोव्यात मडकई, फोंडा, शिरोडा, मुरगाव, वास्को, दाबोळी, कुठ्ठाली, नुवे, बाणावली, वेळ्ळी, कुडतरी, फातोर्डा, मडगाव, नावेली, कुंकळ्ळी, केपे, सावर्डे, कुडचडे, सांगे व काणकोण हे २० मतदारसंघ आहेत. या मतदारसंघापैकी कुंकळ्ळी व केपे मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत, तर वेळ्ळी व बाणावलीत आम आदमी पक्षाचे आमदार आहेत. फातोर्ध्यात गोवा फॉरवर्डचा आमदार आहे, तर कुठ्ठाळी व कुडतरीत अपक्ष व मडकईत मगोचा आमदार आहे. अन्य मतदारसंघांतील आमदार हे भाजपचे आहेत. दोन्ही अपक्ष, तसेच मगो आमदाराचा भाजपला पाठिंबा आहे. ही भाजपसाठी जमेची बाजू आहे. इंडिया आघाडीला आप व गोवा फॉरवर्डचा पाठिंबा आहे. सासष्टीत या आघाडीला बरीच अपेक्षा आहेत. मात्र, येथील राजकारण आता बदलले आहे. भाजपने या तालुक्यात आपली बाजू भक्कम केलेली आहे. त्यामुळे पूर्वीसारखेच या तालुक्यावर संपूर्ण अवलंबून राहणे काँग्रेससाठीही धोक्याचे होऊ शकते.
मडगावातील व्यापारी विनोद शिरोडकर सांगतात की, आम्हाला आता व्यवसाय करणेही परवडत नाही. ऑनलाईन शॉपिंग, सेल तसेच मॉल्समुळे आमचा व्यवसाय धोक्यात आला आहे. जीएसटीचा सध्या तरी परिणाम जाणवत नाही. मात्र, यापुढे जीएसटी वाढविली तर त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसू शकतो.
काँग्रेसचा वरचष्मा पण...
दक्षिण गोव्यात लोकसभेत आतापर्यंत काँग्रेसचाच वरचष्मा राहिला आहे. अपवाद फक्त चार लोकसभा निवडणुकीचा आहे. मगोचे मुकुंद शिक्रे, तसेच भाजपचे रमाकांत आंगले व नरेंद्र सावईकर हे या मतदारसंघातून जिंकून आले होते, तर एकवेळी युगोडेपाच्या उमेदवारीवर चर्चिल आलेमाव हे जिंकून आले होते. या खेपेला काय घडणार आहे हे मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. तूर्त भाजपच्या पल्लवी धेपे, काँग्रेसचे कॅप्टन विरियातो फर्नाडिस यांनी प्रचाराला जोर लावला आहे हे खरे. आरजीचे रुबर्ट परेरा हेही प्रचारात व्यग्र आहेत.
लढत सोपी नाही : प्रभाकर तिंबले
दक्षिण गोव्याची लढत तशी सोपी नाही. भाजप व काँग्रेस हे दोन्ही पक्ष विजयाचा दावा करतात खरे; मात्र मतमोजणीच्या दिवशीच काय ते स्पष्ट होणार आहे. भाजपने प्रचाराचा आपला संपूर्ण फोकस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केंद्रित केला आहे. मोदी यांचा त्यांना पुन्हा राज्यभिषेक करायचा आहे. काँग्रेसने आपला प्रचार सुरू केला. अपेक्षा नव्हती, मात्र त्यांचा प्रचार चांगला सुरू आहे. त्यात अधिक जोश येणे आवश्यक आहे, असे राजकीय विश्लेषक प्रभाकर तिंबले यांनी सांगितले.