"त्या" कंत्राटदाराविरोधात FIR दाखल करा; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी
By पूजा प्रभूगावकर | Published: June 22, 2024 04:57 PM2024-06-22T16:57:04+5:302024-06-22T16:57:27+5:30
या महामार्गावर झालेल्या अपघातांची जबाबदारी केंद्रीय अवजड वाहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे घेणार का ? असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला.
पणजी :राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या दर्जाहीन कामामुळे त्याचा काही भाग कोळसला. यामुळे अपघात होता होता वाचला व तेथून गाडीने जाणारे कुटुंब बचावले. या सर्वाला जबाबदार असलेल्या त्या कंत्राटदारविरोधात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत फाैजदारी गुन्हा दाखल करणार का ? असा प्रश्न कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी उपस्थित केला.
राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या दर्जाहीन कामाचा विषय मागील दोन वर्षापासून कॉंग्रेस उपस्थित करीत आहे.परंतु त्याची दखल सरकारने घेतली नाही. राज्यातील असंवेदनशील सरकार गोमंतकीयांच्या जीवाशी खेळत असल्याची टीकाही त्यांनी केली.
या राष्ट्रीय महामार्ग ६६ चे काम करणारा कंत्राटदार सरकारी जावई बनला आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात कारवाई करण्याचे धाडस सरकार दाखवणार का ?. बांबोळी ते पत्रादेवी महामार्गाच्या अत्यंत खराब बांधकामामुळे अनेक अपघात घडले असून यात काहींचा बळी गेला आहे. या महामार्गावर झालेल्या अपघातांची जबाबदारी केंद्रीय अवजड वाहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे घेणार का ? या प्रश्नाचेही त्यांनी उत्तर द्यावे अशी मागणी पाटकर यांनी केली.