इमेजीन पणजी स्मार्ट सिटीवर गुन्हेगारी तक्रार दाखल करा, कॉंग्रेसचे नेते एल्विस गोम्स यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 02:48 PM2024-02-08T14:48:13+5:302024-02-08T14:48:49+5:30
काल सायंकाळी मळा येथील पाण्याच्या गटारात पडून ५६ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला होता.
- नारायण गावस
पणजी : स्मार्ट सिटीच्या बेजबाबदार कामांमुळे पणजीत आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याला पूर्णपणे पणजी स्मार्ट सिटीचे काम जबाबदार असून त्यामुळे इमेजीन पणजी स्मार्ट सिटी या कंपनीवर गुन्हेगारी तक्रार दाखल करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे नेते एल्विस गोम्स यांनी केली आहे. काल सायंकाळी मळा येथील पाण्याच्या गटारात पडून ५६ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला होता.
एल्विस गोम्स म्हणाले, या अगोदर पणजी मळा येथे स्मार्ट सिटीने खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडून माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुचाकीने पडून मृत्यू झाला होता. यावेळी महापौर, पणजीचे आमदार, मुख्यमंत्री सर्वांनी स्मार्ट सिटीच्या कामाच्या बेजबाबदारपणाची दखल घेतली; पण पुन्हा तोच प्रकार सुरू झाला आहे. या स्मार्ट सिटीच्या बेजबाबदार कामाचे आणखी किती बळी जाणार? या अगोदर अनेक जण पडून जखमी झाले आहेत; पण अजून स्मार्ट सिटीच्या कंत्राटदारावर, अभियंत्यावर तसेच इतर जबाबदार कुणावर काहीच दखल घेतलेली नाही. हा फक्त पैसे खाण्याचा घाेटाळा असून याची सखाेल चौकशी व्हावी, असेही एल्विस गोम्स म्हणाले.
सर्व कामाचे सुरक्षा ऑडिट व्हावे
महेश म्हांबरे म्हणाले, स्मार्ट सिटीच्या सर्व कामांचे सुरक्षा ऑडिट होणे गरजेचे आहे. या अगोदर आम्ही स्मार्ट सिटीचा बेजबाबदारपणाचा विषय सरकारसमोर मांडला होता; पण काहीच दखल घेतली नाही. आता पुन्हा एकाचा मृत्यू झाला आहे. सर्वसामान्य लोकांना पणजीत फिरताना नाहक त्रास होत आहेत. गेली अनेक वर्षे स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे; पण पणजीत अजून कुठेच सुधारणा दिसत नाही. उलट स्मार्ट सिटीच्या कामामुळे पणजीत वाहतूककोंडी होत असते.