मडगाव - गोव्यात शालेय विद्यार्थ्याला शारीरिक शिक्षा देण्यास बंदी असतानाही अशाप्रकारच्या शिक्षांचे प्रमाण वाढले आहे. याबद्दल गोवा राज्य बाल आयोगाने चिंता व्यक्त केलेली असतानाच मडगावातील लॉयोला हायस्कूलमध्ये आठवीत शिकणाऱ्या एका 13 वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याच्या आरोपावरुन या हायस्कूलचे प्राचार्य फा. बाजिल व्हेगो यांच्या विरोधात मडगाव पोलीस स्थानकात गुन्हा नोंद केला आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या त्या विद्यार्थ्याला सध्या हॉस्पिसियो इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
मडगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणो फा. व्हेगो यांच्या विरोधात भादंसंच्या 323 (मारहाणीची शिक्षा करणे), 506(2) (जीवंत मारण्याची धमकी देणे) यासह गोवा बाल कायद्याच्या कलम 8 खाली गुन्हा नोंद केला आहे. तर त्या विद्यार्थ्याला सध्या हॉस्पिसियोत डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
सदर मुलाच्या पालकाने सोमवारी उशिरा मडगाव पोलीस स्थानकात ही तक्रार दिली होती. या तक्रारीप्रमाणो, 27 जानेवारी रोजी त्याच्या मुलाला एका टीचरने शिक्षा म्हणून वर्गाबाहेर ठेवले होते. त्याचवेळी प्रा. व्हेगो तेथे आले. सदर विद्यार्थी ग्रील्सवरुन वाकून खाली पहातो असे निमित्त पुढे करुन प्राचार्यानी त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत त्या मुलाच्या नाका-तोंडातून रक्तही वाहू लागले. असे असताना शाळेच्या व्यवस्थापनाने त्याच्या पालकांनाही ही कल्पना दिली नाही किंवा त्याच्यावर प्रथमोपचारही केला नाही असे या तक्रारीत म्हटले आहे.
सदर मुलाने शाळेतील हा प्रकार घरी सांगितला नव्हता. मात्र सोमवारी त्याचा कान आणि डोके दुखू लागल्यामुळे त्याला खोदून खोदून विचारले असता, त्याने वरील माहिती दिली असे या तक्रारीत म्हटले आहे. या संबंधी मडगावचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्याशी संपर्क साधला असता, सदर मुलगा अजुनही वैद्यकीय निगराणीखाली आहे. अजुनही पोलिसांना दुखापती संदर्भात अहवाल मिळालेला नाही असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी प्राचार्याना चौकशीसाठी बोलावले असता, सदर मुलगा ग्रील्सवरुन वाकून पहातो, यामुळे आपण त्याच्या डोक्यावर केवळ चापटी मारली होती असा खुलासा फा.व्हेगो यांनी पोलिसांकडे केला. मात्र या मुलाच्या पालकांनी शाळेतील सीसीटीव्ही कॅमे:याची फुटेज तपासून पहावी अशी मागणी पोलिसांकडे केली असता या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले असे पालकांनी सांगितले.