लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजपचे दोन्ही उमेदवार रामनवमीच्या पूर्वसंध्येला मंगळवार, १६ रोजी उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली. १७ रोजी रामनवमीची सुटी आहे. त्यामुळे १६ रोजी भाजप उमेदवार अर्ज सादर करतील, असे त्यांनी सांगितले.
संबंधित कार्यालयांमध्ये जिल्हाधिकारी निर्वाचन अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केले जातील. भाजपने दक्षिण गोवा मतदारसंघातून पल्लवी धेंपे व उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक यांची उमेदवारी याआधीच जाहीर केलेली आहे.
काँग्रेसने दिलेले इंडिया आघाडीचे उमेदवार दि. १५ व १६ रोजी अर्ज सादर करतील, असे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी स्पष्ट केलेले आहे. काँग्रेसने उत्तर गोव्यातून रमाकांत खलप व दक्षिण गोव्यातून विरियातो फर्नांडिस यांना तिकीट दिली आहे. आरजीचे उमेदवार मनोज परब व रुबर्ट परैरा आपले उमेदवारी अर्ज पुढील आठवड्यात सादर करणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. अर्ज भरण्यासाठी १९ एप्रिल ही शेवटची तारीख आहे. २० रोजी अर्जाची छाननी होईल, २२ रोजी अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी लढतीचे चित्र स्पष्ट होईल. ७ मे रोजी मतदान व ४ जून रोजी मतमोजणी.