पणजी : राज्यात पेट्रोलचा दर उद्या शनिवारपासून प्रतिलिटर ६४ रुपये ८८ पैसे होणार आहे. त्याबाबतची अधिसूचना सरकारने जारी केली आहे. वाणिज्य कर खात्याच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती गुरुवारी ‘लोकमत’ला दिली.सध्या पेट्रोलचा दर प्रतिलिटर ६० रुपये ३० पैसे आहे. हा दर उद्या शनिवार, दि. १ एप्रिलपासून ६४ रुपये ८८ पैसे म्हणजे जवळजवळ ६५ रुपये होणार आहे. त्यामुळे गुरुवारपासूनच पेट्रोल पंपांवर वाहनांची गर्दी होऊ लागली आहे. प्रत्येक वाहनधारक टाकी भरून घेऊ लागला आहे. साधारणत: पाच रुपयांनी पेट्रोल उद्यापासून महागणार आहे. एकदम एवढ्या प्रमाणात पेट्रोलचे दर सरकारने यापूर्वी कधी वाढवले नव्हते. पेट्रोलवर ७ टक्के मूल्यवर्धित कर (व्हॅट) होता. हे प्रमाण आता ८ टक्क्यांनी वाढवून एकूण प्रमाण १५ टक्के करण्यात आले आहे. सरकारला यामुळे पन्नास ते साठ कोटींचा वार्षिक लाभ होईल. वाहनधारकांच्या खिशाला मात्र चिमटे येणार आहेत. आज शुक्रवारीही मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी पेट्रोल पंपांवर होणार आहे. पेट्रोल दरवाढीची अधिसूचना आज शुक्रवारी राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे.२०१२ साली सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर एकदम कमी केला होता. नंतर टप्प्याटप्प्याने तो वाढविला गेला. पेट्रोलचा दर प्रतिलिटरमागे त्या वेळी साठ रुपये ठेवला गेला होता.(खास प्रतिनिधी)
पेट्रोलच्या टाक्या आज फुल्ल करा
By admin | Published: March 31, 2017 2:47 AM