- संदीप आडनाईक
पणजी : गोव्यात सुरु असलेल्या ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग असलेल्या एनएफडीसीच्या १२ व्या फिल्म बाजारला विशाल भारद्वाज, रघुवरन, अभिषेक चौबे, सिध्दार्थ लाय कपूर यांच्यासारख्या देशविदेशातील सिनेमा क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारपासून प्रारंभ झाला. ३५ विविध भाषेतील विक्रमी २१७ चित्रपट या बाजारमध्ये दाखविले जात आहेत. यात १0८ सिनेमे हे नवोदितांचे आहे, हे विशेष.जगभरातील चित्रपट निमांते, दिग्दर्शक, वितरक, फिल्म फेस्टिव्हल्सचे आयोजक आणि चित्रपट रसिकांसाठी एनएफडीसीचा हा फिल्म बाजार एक मोठे व्यासपीठ बनले आहे. ३८ देशातील ८३२ प्रतिनिधी या बाजारमध्ये सहभागी आहेत, त्यात १७८ जण विदेशी आहेत. चार दिवसाच्या या कार्यक्रमात विविध राज्यांसाठी एक खिडकी कार्यालये (फिल्म फॅसिलेशन आॅफिस), स्वतंत्र निर्मांत्यांची कार्यशाळा, नवे चित्रपट यांचा मेळाच येथील हॉटेल मेरियट येथे भरला आहे. दक्षिण आशियातील सर्वात मोठा चित्रपट व्यावसायिकांचे हे मार्केट आहे. यावर्षी भारतासह आॅस्ट्रेलिया, बांगला देश, भूतान, चीन, जर्मनी, श्रीलंका आणि अमेरिकेसारख्या देशातून १९ चित्रपट सहनिर्मिती प्रकल्पासाठी सहभागी झाले आहेत. यामध्ये हिंदी, मराठी. कोंकणी, नेपाळी, भोजपुरी, गेरो, दोजखा, तमिळ, मल्याळम आणि इंग्लिश भाषेतील प्रादेशिक चित्रपटांचाही समावेश आहे. यावर्षी फिल्म बाजारमार्फत २२ पूर्ण लांबीचे आणि २ लघुपटांची शिफारस मार्केटिंगसाठी करण्यात आली आहे. यासाठी देशभरातून १५३ मुख्य प्रवाहातील आणि १४ प्रादेशिक भाषेतील सिनेमांचा प्रस्ताव एनएफडीसीकडे आला होता. याशिवाय पूर्ण लांबीच्या १५३ सिनेमे, १८ माहितीपट आणि ६४ लघुपट अशा २१७ विक्रमी संख्येने सिनेमे या बाजारमध्ये दाखविण्यात येत आहेत. वेगवेगळ्या ३५ भाषेतील सिनेमे हे याचे वैशिष्ट्य असून त्यातील १६0 सिनेमांचे वर्ल्ड प्रिमियर यात होत आहे शिवाय १0८ नवोदितांचे सिनेमे या बाजारमध्ये दाखविण्यात येत आहेत.