सुशांत कुंकळयेकर
मडगाव : तीन वर्षापूर्वी पाटणो-काणकोण येथे गूढरित्या मृत्यू आलेल्या फेलिक्स दहाल या 22 वर्षीय फिनीश युवकाच्या खून प्रकरणात काणकोण पोलिसांना कुठलेही पुरावे न मिळाल्याने शेवटी काल बुधवारी ही केस बंद करण्यासाठी काणकोण पोलिसांतर्फे काणकोणच्या प्रथम वर्ग न्यायालयात ‘फायनल’ रिपोर्ट सादर करण्यात आला.काणकोणचे पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभूदेसाई यांनी काणकोण न्यायालयात बुधवारी सादर केलेल्या अर्जात ही केस बंद करण्याची अनुमती मागितली आहे. यासंबंधी लोकमतशी बोलताना प्रभूदेसाई म्हणाले, न्यायालयाच्या आदेशानंतर हे प्रकरण खून म्हणून नोंद करुन आम्ही तपास सुरु केला होता. मात्र सदर प्रकरणात खून झाल्याचा कुठलाही पुरावा हाती न लागल्याने आम्ही ही केस बंद करण्यासाठी न्यायालयाकडे मागणी केली आहे. 28 जानेवारी 2015 रोजी पाटणो-काणकोण येथील एका रस्त्यावर फेलिक्स मृतावस्थेत सापडला होता. सुरुवातीला काणकोण पोलिसांनी हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केले होते. मात्र मयत फेलिक्सची आई मीना फिरहॉनन यांनी पैशांच्या वादातून आपल्या मुलाचा गोव्यात खून झाला असा दावा केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरुन तब्बल एक वर्षाच्या कालावधीनंतर काणकोण पोलिसांनी हे प्रकरण खून म्हणून नोंद केले होते.दरम्यान, काणकोण पोलिसांनी फेलिक्सबरोबर त्यावेळी गोव्यात वास्तव करुन असलेल्या दोन जयपूरच्या युवकांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र या चौकशीतूनही पोलिसांच्या काही हाती लागू शकले नव्हते. फेलिक्सच्या आईच्या दाव्याप्रमाणो, याच दोन युवकांकडे फेलिक्सने एका जमीन विक्री प्रकरणाचा व्यवहार केला होता. या व्यवहारातून जो फायदा मिळाला होता त्याचा वाटा फेलिक्सला द्यावा लागेल यामुळेच त्याचा खून करण्यात आला असा वहीम तिने व्यक्त केला होता.दरम्यान, काणकोण पोलिसांनी हे प्रकरण योग्यरित्या हाताळले नाही असा दावा फेलिक्सच्या आईने केला होता. हे प्रकरण गोवा पोलिसांच्या हातातून काढून घेऊन सीबीआयकडे तपासासाठी द्यावे अशी मागणी करणारा अर्ज तिने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता.