लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : विद्यार्थिनी वरील विनयभंग प्रकरणी शिक्षकावर कारवाही होत नाही ते पाहून संतप्त झालेल्या ग्रामस्थांच्या रोशास बळी पडून शेवटी त्याचे निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तालुक्यातील एका माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी शारीरिक शिक्षकाच्या विरोधात शाळा व्यवस्थापनाने शिस्तभंगाची कारवाई म्हणून घटनेच्या कित्येक दिवसानंतर सदर निलंबनाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान सदर शिक्षकाने पणजी येथील बाल न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनावर निवाडा आला असून ,बाल न्यायालयाने शिक्षकाचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
सदर विनयभंगाचे प्रकरण तीन महिन्यापूर्वी घडले होते असा दावा लोकांनी केला होता या संदर्भात मुलीच्या पालकानी तक्रारी शाळेच्या संबंधित घटकांकडे केल्या होत्या. परंतु त्या शिक्षकाविरुद्ध कोणतीच कारवाई केली नव्हती. परिणामी आर जी पक्षाचे कार्यकर्ते व काही ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन म्हार्दोळ पोलीस स्थानकावर सदर शिक्षकाविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर सुद्धा त्या शिक्षकावर कारवाई होत नाही ते पाहून ग्रामस्थांनी पोलीस स्थानकांच्या समोर मोठ्या संख्येने जमा होऊन निषेध व्यक्त केला होता. तसेच मुदतीत सदर शिक्षकांवर कारवाई न झाल्यास पोलीस स्थानका समोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिला होता.
गोवा शालेय नियम अधिनियम १९८४ च्या कलम ११ (३) च्या अधिकाराचा वापर करून शाळेच्या व्यवस्थापकीय समितीच्या अध्यक्षांनी शारीरिक शिक्षकाला ६ सप्टेंबरपासून १५ दिवसांसाठी निलंबनाचा आदेश जारी केला आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार एका विद्यार्थिनीवर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आल्याची तक्रार शाळा व्यवस्थापन समितीकडे १३ जुलै रोजी दाखल करण्यात आली होती. शाळा व्यवस्थापनाने १५ जुलै रोजी त्या शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावून त्याच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई का सुरू केली जाऊ नये, याचे स्पष्टीकरण मागितले होते. परंतु या संदर्भात सदर शिक्षकाकडून समाधानकारक स्पष्टीकरण व्यवस्थापनाला मिळाले नव्हते.व्यवस्थापनाकडून कोणतीही कारवाई शिक्षकावर न केल्याने मुलीच्या पालकांनी रितसर तक्रार म्हार्दोळ पोलीस स्थानकात दाखल केल्यानंतर शारीरिक शिक्षकावर २८ ऑगस्ट रोजी विनयभंगप्रकरणी भा.दं.सं. ३५४, गोवा बाल कायदा २००३ चे कलम ८ (२) व पोस्को कायद्याचे कलम १२ आणि ८ अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्याला अनुसरून अखेर शाळा व्यवस्थापनाने उशिरा का होईना त्या संशयित शारीरिक शिक्षकाविरोधात निलंबनाचे आदेश जारी केले आहे.