पंकज शेट्येवास्को - यंदाचे आर्थिक वर्ष रविवारी (३१ मार्च) पूर्ण झाले असून गोव्याच्या दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाने मागील १२ महिन्यात विविध सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणात ८ किलो ८०० ग्राम तस्करी करून आणलेले सोने जप्त केले आहे. दाबोळी विमानतळावर या आर्थिक वर्षात तस्करीचे सोने आणण्याबरोबरच बेकायदेशीररित्या येथून विविध विदेशी चलने सुद्धा प्रवाशांकडून नेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. अशा प्रकारांवर कारवाई करत दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाने ५२ लाख ७८ हजार रुपयांची विदेशी चलने सुद्धा जप्त केली आहेत.
दाबोळी विमानतळावर या आर्थिक वर्षात अनेक प्रवाशांनी विदेशातून तस्करीचे सोने आणल्यानंतर ते येथून बाहेर काढण्याचे विविध प्रकारचे प्रयत्न केले, मात्र याच्या विरुद्ध कारवाई करण्यास येथील कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना बऱ्यापैकी यश आल्याचे दिसून आले आहे. या आर्थिक वर्षात अर्थात १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ च्या कालावधीत विमानतळावर असलेल्या कस्टम अधिकाऱ्यांनी १८ वेगवेगळ्या प्रकरणात येथे आलेल्या प्रवाशांकडून एकूण ८ किलो ८०० ग्राम तस्करीचे सोने जप्त केले असल्याची माहिती कस्टम उपकमिश्नर डॉ. राघवेंद्र पी यांनी दिली. विविध प्रवाशांकडून जप्त करण्यात आलेल्या या तस्करीच्या सोन्याची एकूण किंमत २ कोटी ५६ लाख रुपये असल्याची माहिती राघवेंद्र यांनी पुढे देऊन हे सोने गोव्यात आणल्यानंतर ते कुठे नेणार होते अशा विविध प्रकारच्या चौकशी सुद्धा चालू असल्याची माहिती त्यांनी दिली.
तस्करीचे सोने पकडण्यात न यावे यासाठी ते विविध प्रकारे लपवून आणलेले असल्याचे या वर्षात दिसून आलेले असल्याची माहिती डॉ. राघवेंद्र यांनी देऊन आमच्या अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अशा प्रकारचे करण्यात आलेले विविध प्रयत्न फसलेले असल्याचे सांगितले. दुधाच्या पावडर मध्ये सोन्याची पुड मिसळून, विविध रसायनात सोने मिसळून ते पेस्ट पद्धतीने आपल्या अंगावर लपवून, कमरेला घालण्यात आलेल्या बेल्टमध्ये लपवून, विविध प्रकारच्या भेटवस्तूमध्ये लपवून, बनावट दागिन्यामध्ये लपवून इत्यादी अशा विविध प्रकारे तस्करीचे सोने लपवून आणण्यात आलेले असल्याचे या वर्षात आढळून आले आहे. मागच्या आर्थिक वर्षात व यंदाच्या वर्षात पकडण्यात आलेल्या तस्करीच्या प्रमाणात एकंदरीत समानता असल्याची माहिती डॉ. राघवेंद्रा यांनी दिली. दाबोळी विमानतळावर सोन्याची तस्करीची प्रकरणे जास्त आढळतात अशी लोकांमध्ये असलेली समज चुकीची असून भारतातील अन्य विमानतळावर सुद्धा अशा प्रकारची सोन्याच्या तस्करीची प्रकरणे आढळून येतात.
दाबोळी विमानतळावर या आर्थिक वर्षात सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणाबरोबरच बेकायदेशीररित्या विदेशी चलने सुद्धा प्रवाशांकडून नेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला असल्याचे आढळून आले आहे. या वर्षात चार विविध प्रकरणात चार प्रवाशांकडून भारतीय किंमतीनुसार कस्टम अधिकाऱ्यांनी ५२ लाख ७८ हजार रुपयांची विदेशी चलने जप्त केली असल्याची माहीती डॉ. राघवेंद्र यांनी दिली. सोने तस्करीची प्रकरणे कुठल्यातरी एका महिन्यात जास्त आढळून येतात असा समज चुकीचा असून अशा प्रकारची प्रकरणे एकंदरीत प्रत्येक महिन्यात आढळून येतात. बाजारात होत असलेल्या सोन्याच्या भावावर कधी कधी सोन्याच्या तस्करीची प्रकरणे वाढत असल्याचे दिसून आलेले असल्याचे राघवेंद्र यांनी माहितीत सांगितले. सोने तस्करीची प्रकरणे व इतर गैरप्रकारावर कडक रित्या आळा घालण्यासाठी कस्टम अधिकारी सतत सतर्क असत असून त्यांना वेळोवेळी विविध गोष्टीबाबत प्रशिक्षण सुद्धा देण्यात येतात. नवीन पद्धतीने सोने तस्करी करण्याचा प्रकार कुठे ही आढळून आल्यास कस्टम अधिकाऱ्याला त्याबाबत माहीती असावी व कशा पद्धतीने सदर प्रकरणे पकडावी याबाबत सुद्धा सतत प्रशिक्षण देण्यात येते अशी माहीती राघवेंद्र यांनी दिली. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांनी माहिती, कुठल्याही प्रकारची पूर्व माहिती, विमानतळावर प्रवाशांची होणारी संशयास्पद हालचाली अशा विविध गोष्टीवर कस्टम अधिकाऱ्यांची बारकाईने नजर असते असे राघवेंद्र यांनी माहितीत सांगितले. दाबोळी विमानतळाच्या कस्टम विभागाचे कमिश्नर आर मनोहर यांचे सतत अधिकाऱ्यांना मिळत असलेल्या मार्गदर्शनामुळेच व कस्टम अधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळे दाबोळी विमानतळावर होत असलेल्या तस्करी व इतर गैरप्रकारावर आळा घालण्यास कस्टम विभाग यशस्वी होत असल्याचे डॉ. राघवेंद्र यांनी माहितीत शेवटी सांगितले.