वासुदेव पागी ल्ल पणजीबारावीच्या परीक्षेसाठी अवघे १५ दिवस राहिले असताना गोवा शालान्त मंडळाला काणकोणमध्ये परीक्षा केंद्र मिळाले नसल्यामुळे पंचाईत झाली आहे. येथील नेहमीचे परीक्षा केंद्र म्हणून वापरले जाणाऱ्या शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाचे दुरुस्ती काम सुरू असल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. गोवा शालान्त मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षा यंदा १ मार्च रोजी सुरू होत आहेत. राज्यातील सर्व ठिकाणी परीक्षा केंद्रे निश्चित झाली आहेत. केवळ काणकोणमध्येच घोडे अडले आहेत. शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाचे दुरुस्ती काम सुरू असल्यामुळे हे विद्यालय यंदा परीक्षा केंद्र म्हणून वापरायला मिळणार नाही. त्यामुळे गोवा शालान्त महामंडळाने काणकोणचे श्री मल्लिकार्जुन विद्यालय आणि सेंट तेरेझा हायस्कूल चावडी ही दोन्ही विद्यालये परीक्षा केंद्रे म्हणून वापरण्यासाठी विद्यालयाकडे सहकार्य मागितले होते. तशी पत्रेही या विद्यालयांना शालान्त मंडळाकडून पाठविण्यात आली आहेत. सेंट तेरेझा विद्यालयाकडून त्यासाठी सहकार्य करण्यात आले आहे; परंतु मल्लिकार्जुन विद्यालयाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद देण्यात न आल्यामुळे शालान्त मंडळाची पंचाईत झाली आहे. सेंट तेरेझा हायस्कूलमधील खोली फार लहान असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांची तेथे सोय होणे शक्य नाही. त्यामुळेच चाररस्ता-काणकोण येथे श्री मल्लिकार्जुन विद्यालय हे आणखी एक केंद्र करण्याचा निर्णय शालान्त मंडळाने घेतला होता. ही दोन्ही विद्यालये तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांसाठी ते सोयीचे ठरले असते आणि त्यासाठीच शालान्त मंडळाने हा निर्णय घेतला होता. मात्र, बारावीच्या परीक्षेदरम्यान त्यांच्या शाळेचे वर्ग बंद ठेवावे लागतील, या भीतीने विद्यालयाकडून त्याला अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे परीक्षा केंद्राच्या बाबतीत अनिश्चितता कायम आहे. याविषयी शालान्त मंडळाचे अध्यक्ष जे. आर. रिबेलो यांना विचारले असता त्यांनी परीक्षा केंद्रासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. परीक्षा केंद्र काणकोण मध्यवर्ती ठिकाणीच करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. त्यात निश्चितच यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला; परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काणकोणमध्ये परीक्षा केंद्रासाठी जागा मिळू न शकल्यास माशे-लोलये येथे परीक्षा केंद्र करण्याची तयारीही शालान्त मंडळाने ठेवली आहे. या ठिकाणी एस. एस. आंगले उच्च माद्यमिक विद्यालयाचाही विचार होऊ शकतो.