पणजी - गोवा पोलिसांनी सुरू केलेल्या गोवा ट्रॅफिक सेन्टीनल योजनेचा दणका गोव्याच्या अर्ध्या लोकसंकेला बसला आहे. १४.५ लाख लोकसंख्येच्या गोव्यात ७.७४ लाख लोकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आल्याची माहिती गोवा पोलिसांनी जारी केली आहे. गोव्याचे महासंचालक मुक्तेश चंदर यांनी ही माहिती दिली. वर्षभरात एकूण ९.१९ कोटी रुपये या उल्लंघनांसाठी दंड वसुलीसाठी चलने पाठविण्यात आली आहेत. अतापर्यंत ६.४० कोटी रुपयांची वसुली झाली आहे अशी माहिती चंदर यांनी दिली. राज्यात ट्रॅफिक सेन्टीनल योजनेविषयी कितीही तक्रारी असल्या तरी ती बंद करण्याचा प्रश्नच नसल्याचे ते म्हणाले. या योजनेमुळे अपघात खाली आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. पोलिसांच्या सतावणुकीमुळे गोव्यात पर्यटक कमी झाले हा गोवा ट्युर व ट्रॅवल्स संघनेचा दावा त्यांनी फेटाळला. उलट पोलिसांमुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला. ड्रग्स विरोधी कारवाईतही चांगली कामगिरी बजावण्यात आल्याचा दावा करण्यात आहे. एनडीपीएस कायद्याखाली वर्षभरात २२२ प्रकरणात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यात २३७ संशयितांना अटक करण्यात आली. गेल्यावर्षी १९० जणांना अटक करण्यात अली होती तर १६८ प्रकरणात गुन्हे नोंदविण्यात आले होते. मानवी तस्करीच्या बाबतीतील कारवाईतही ३२ टक्के वाढ झाली आहे. एकूण ५२ प्रकरणात ३९ जणांना अटक करण्यात आली आहे. ध्रूम्रपानासाठी १९७४० प्रकरणात गुन्हे नोंदविले आहेत. काणकोण येथे विदेशी महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणात वेगाने कारवाई करून संशयिताला पकडणा-या पोलिसांचा महासंचालकांनी गौरव केला. काणकोण व पेडणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक अनुक्रमे राजेंद्र प्रभुदेसाई व संदेश चोडणकर यांच्यासह इतर पोलीस यावेळी उपस्थित होते.
ट्रॅफिक सेन्टीनलचा दणका, गोव्याच्या अर्ध्या लोकसंख्येला चलन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 10:24 PM