पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) घोटाळा प्रकरणातील तिन्ही प्रमुख आरोपी तत्कालीन पदाधिकारी व माजी मंत्री दयानंद नार्वेकर, चेतन देसाई, बाळू ऊर्फ विनोद फडके आणि अकबर मुल्ला यांच्या एकूण ४.१३ कोटी रुपयांच्या मालमत्ता सक्तवसुली विभागाकडून (ईडी) जप्त केल्या आहेत. मनी लॉंडरिंगच्या अनुषंगाने इडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. जीसीए घोटाळा प्रकरणात ईडीतर्फे धडक कारवाई सुरू करण्यात आली असून आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्यात अल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून जीसीएसाठी अनुदान म्हणून देण्यात आलेली ६.९५ कोटी रुपयांची रक्कम तिघांकडून लाटण्याच्या प्रकरणात मनी लॉंडरिंगची शक्यताही उघडकीस आल्यामुळे इडीतर्फेही गुन्हा नोंदविण्यात आला होता आणि तपास सुरू करण्यात आला होता. या प्रकरणात काही ठोस पुरावे आढळून आल्यामुळे इडीकडून ही जप्तीची कारवाई करण्यात आल्याची माहिती या विभागाकडून देण्यात आली.या प्रकरणात पोलीस खात्याच्या आर्थिक गुन्हा विभागाकडून गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर तिघांना अटकही करण्यात आली होती. नंतर काही दिवसांनी त्यांची जामीनवर सुटका झाली होती. या प्रकरणात एक नव्हे तर तीन वेगवेगळे गुन्हे नोंदविण्यात आले होते, त्यातील एका प्रकरणात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे, तर बाकीच्या दोन प्रकरणात अरोपपत्र दाखल करणे बाकी आहे.
असा केला घोटाळा२००६ -०७ साली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ६.९७ कोटी रुपये जीसीएला अनुदान जारी केले होते. या अनुदानाची रक्कम जीसीएच्या अधिकृत खात्यात जमा करण्याऐवजी कुंडई - फोंडा यथील शिरोडा अर्बन सहकारी सोसायटीत जीसीएच्या नावे बोगस खाते खोलून त्यात ही रक्कम जमा करण्यात आली. या बाबतीत एवढी गुप्तता ठेवण्यात आली की जीसीएच्या सर्वसाधरण बैठकीतही त्याचा उल्लेख करण्यात आला नाही. त्यानंतर विविध बोगस एजन्सीच्या नावावर टप्प्या टप्प्याने धनादेश जारी करून ही रक्कम लाटण्यात आली. चौकशी दरम्यान ही रक्कम नार्वेकर यांच्यासह तिन्ही पदाधिकाºयांनीच उकळल्याचे आढळून आले असून ज्या एजन्सींच्या नावे धनादेश वठवले गेले त्यांना रक्कम मिळाली नसल्याचे तसेच त्यांचे जीसीएशी कोणतेही व्यवहार नसल्याचे कबुली जवाबही या एजन्सीकडून देण्यात आले आहेत.