म्हापसा: गोवा- महाराष्ट्र महामार्गालगत मुशीरवाडा-कोलवाळ येथे रविवारी मध्यरात्री नंतर अडीच वाजण्याच्या सुमारास भंगार अड्ड्याला आग लागण्याचा प्रकार घडला आहे. फरयाज खान यांच्या मालकीच्या या भंगार अड्ड्याला लागलेल्या आगीत सुमारे ८० हजार रुपयांची नुकसानी झाली असून २० लाख रुपयांची मालमत्ता वाचवण्यास अग्नी शमन दलाच्या जवानांना यश प्राप्त झाले आहे. लागलेल्या आगीनंतर कोलवाळ पोलिसांच्या सहकार्याने परिसरातील लोकवस्ती सुरक्षेच्या कारणास्तव खाली करण्यात आली.
गेल्या वर्षी डिसेंबरात याच परिसरात भंगार अड्ड्याला आग लागून मोठ्या प्रमाणावर मालमत्तेच्या हानी सोबत जिवीत हानी होण्याचा प्रकार घडलेला. घडलेल्या या प्रकारानंतर तेथील भंगार अड्ड्यांचा मुद्दा ऐरणीवर आलेला. अड्ड्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली होती.
मध्यरात्री लागलेल्या आगीत पत्रावळी तसेच द्रोणसाठी वापरला जाणाºया पेपरला आग लागली होती. तसेच काही प्रमाणावर प्लास्टीक तसेच इतर काही साहित्य आगीत नष्ट झाले. ज्या भंगार अड्ड्याला आग लागली त्यालाच लागून असलेल्या दुसºया भंगार अड्ड्यावर बॅरेलात रसायनचा साठा साठवून ठेवण्यात आलेला. दलाच्या जवानांनी तसेच स्थानीकांनी केलेल्या हालचालीमुळे आगीवर नियंत्रण येऊ शकले. दलाचे सहाय्यक अधिकारा ज्ञानेश्वर परब यांनी दिलेल्या माहितीनुसार अडीच तासाच्या मेहनतीनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश प्राप्त झाले.