मडगाव: मडगावच्या सोनसोडो येथील कचरा यार्डाला सोमवारी लागलेली आग मंगळवारपर्यंत तशीच धुमसत असून ही आग आटोक्यात आणण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, ही आग नियंत्रणात यावी यासाठी कचरा यार्डवर औषधाचा फवारा मारण्यात आला असून त्यामुळे या कचऱ्यातून वायूचे उत्सर्जन व्हायचे बंद होऊन ही आग आटोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
सोमवारी दुपारी 1.30 च्या सुमारास या कचरा यार्डला आग लागली होती. दुपारी वारा भणभणत असल्यामुळे ती चोहोबाजूंना पसरली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी मडगाव, वेर्णा, वास्को व कुडचडे येथून आगीचे बंब आणण्यात आले. मात्र अथक प्रयत्न करुनही ती आटोक्यात आली नव्हती. मंगळवारी ही आग पेटतच राहिल्याने सभोवताली धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नांमध्येही अडथळे निर्माण झाले होते. यापूर्वीही उन्हाळ्यात कचऱ्याला आगी लागण्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर आग लागण्याची ही पहिलीच घटना असून ही आग आणखी काही दिवस अशीच धुमसत राहण्याची शक्यता अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.