पणजी : गोवा व महाराष्ट्रात परिचित असलेले मराठी साहित्यिक विष्णू वाघ यांच्या सुदिरसुक्त ह्या पुस्तकाविरुद्ध पोलिसांनी नुकताच जो एफआयआर तथा गुन्हा दाखल केला आहे, त्याच्याशी आपल्या सरकारचा काही संबंध नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी येथे मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. लेखक वाघ यांच्या सुदिरसुक्त ह्या कवितासंग्रहाचा विषय सध्या गोव्यात खूप गाजत आहे. उच्चवर्णीय विरुद्ध बहुजन असे वळणही काहीजणांनी या वादाला दिले आहे. नुकताच पोलिसांनी वाघ यांच्याविरुद्ध आणि अपुरबाय ह्या प्रकाशन संस्थेविरूद्ध गुन्हा नोंद केल्यामुळे वादाची व्याप्ती वाढली.
या पार्श्वभूमीवर बोलताना पर्रीकर म्हणाले की, आपण स्वतः व्यक्ती स्वातंत्र्य तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानतो. वाघ यांचे पुस्तक अश्लील आहे की नाही किंवा त्यात काही आक्षेपार्ह आहे की नाही हे साहित्यातील व भाषेतील तज्ज्ञ ठरवतील. पोलिसांकडे एका एनजीओची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंद केला. त्यात गंभीर काही नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार तक्रार आल्यानंतर एफआयआर नोंद करावाच लागतो. पर्रीकर म्हणाले की, 'आपल्या सरकारचा या विषयाशी काही संबंध नाही. मी पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करत नाही'.