पणजी : स्थानकांवर अनेकदा स्वच्छ शौचालयांअभावी प्रवाशांची कुचंबणा होत असते. त्यामुळे प्रवासी या शौचालयांकडे पाहून नाक मुरडतात. ही स्थिती बदलण्यासाठी कदंब परिवहन महामंडळातर्फे राज्यातील प्रमुख शहरांतील कदंब बस स्थानकांवर जैव शौचालये (बायो टॉयलेट्स) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात पणजी कदंब स्थानकापासून होणार असल्याची माहिती महामंडळातर्फे दिली गेली. चतुर्थीनंतर या कामाला सुरुवात होणार आहे.
‘स्थानकावर सुलभ शौचालयांची सुविधा असली तरी खास करून पुरुष मंडळीकडून आडोशाला असणाऱ्या खुल्या जागेत लघुशंका केली जाते. त्यामुळे स्वच्छतेवर परिणाम होतो व त्याला विद्रुपकरण होते. हीच स्थिती बदलण्यासाठी व पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्यासाठी महामंडळाचे अध्यक्ष कार्लुस आल्मेदा यांनी ही संकल्पना समोर आणली आहे. त्या दुष्टिकोनातून ही संकल्पना राबविली जात आहे,’ अशी माहिती कदंब परिवन महामंडळाचे महाव्यवस्थापक संजय घाटे यांनी दिली.
ते म्हणाले, मुंबईतील ‘लायन क्लब इंटरनॅशनल मुंबई’ या नामांकित कंपनीला महामंडळाने याविषयी आरखडा पाठविला असून त्याला मान्यता मिळाली आहे. आज, शुक्रवारी (७ सप्टेंबर) संचालक मंडळाच्या बैठकीत औपचारिकरित्या याला परवानगी मिळेल व त्या अनुषंगाने कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती संजय घाटे यांनी दिली. सीएसआर (केंद्रीय सामाजिक जबाबदारी निधीतर्गत) ही सुविधा पुरविली जाईल. पणजीपासून याची सुरुवात होईल. त्यानंतर म्हापसा, मडगाव येथील स्थानकावर ही शौचालये बांधली जातील. पणजी कदंब स्थानकाच्या पाच ठिकाणी ही शौचालये उभारले जातील.
बायोडायजेस्टर व सेप्टिक टाकीकंपनीकडून चांगल्या स्वच्छतेसाठी बायो डायजेस्टर टाकी आणि सेप्टिक टाकी प्रदान केली जाईल. ही टाकी अत्यंत विश्वसनीय आणि प्रदूषणनाला कोणतेही हानी पोहचवणार नाही. जमिनीवर किंवा भूमिगत असे आवश्यकतेनुसार ही टाकी गरजेनुसार कोणत्याही ठिकाणी स्थापित करता येते. या टाक्या ५०० लीटर, १००० लीटर व २००० लीटरमध्ये उपलब्ध आहेत. ही टाकी उपयोग व वापरकर्त्यांच्या आवश्यक तेनुसार बसवता येईल. जिथे केंद्रीयकृत गटार व्यवस्था नसेल अशा शहरातील क्षेत्रात ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
जैव शौचालय असणार कसे?ही इलेक्ट्रॉनिक स्मार्ट सार्वजनिक शौचालये पूर्वनिर्मित व स्टीलची असतील. स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी ते इलेक्ट्रॉनिक्सशी एकाग्र आहे. स्वच्छता क्षमतासह शौचालये मानवरहित असतील. हे शौचालय मानव संवेदक आधारित तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रोग्रॅम केले आहेत, जेणेकरुन ३ मिनिटे वापरानंतर १.५ लिटर पाणी फ्लश करेल किंवा वापर जास्त असल्यास ३.५ लिटर पाणी फ्लश होईल. प्रत्येक ५ ते १० व्यक्तींनी शौचालयाचा वापर केल्यानंतर प्लॅटफॉर्मला संपूर्णपणे स्वच्छ धुवून करण्यासाठी प्रोगाम केले जाऊ शकते.