वास्को: ह्या वर्षाच्या पर्यटक हंगामातील पहिले विदेशी क्रुझ जहाज रविवारी १५८७ विदेशी पर्यटकांना घेऊन गोव्याच्या मुरगाव बंदरात दाखल झाले असून, गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्याने त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. ‘आयडा विटा’ नावाचे हे विदेशी क्रुझ जहाज मस्कत राष्ट्रातून विदेशी पर्यटकांना घेऊन गोव्यात आले असून यानंतर उशिरा संध्याकाळी जहाज पर्यटकांना घेऊन मंगळूरला जाण्यासाठी रवाना होणार आहे.ऑक्टोबर महिन्यात गोव्यातील पर्यटक हंगामाला सुरवात झाल्यानंतर ४ ऑक्टोबरला ह्या वर्षाचे पहिले विदेशी चार्टर विमान मोस्कोहून विदेशी पर्यटकांना घेऊन गोव्याच्या दाबोळी विमानतळावर पोहोचले होते. आज (दि.३) ‘आयडा विटा’ विदेशी क्रुज जहाज मुरगाव बंदरात दाखल झाले असून, ह्या वर्षाच्या गोवा पर्यटक हंगामातील गोव्यात पोहोचणारे हे पहिले विदेशी क्रुझ जहाज ठरले आहे. मस्कत राष्ट्रातून हे जहाज रविवारी मुरगाव बंदरात पोहोचले असून यात एकूण १५८७ विदेशी पर्यटक (११८१ विदेश पर्यटक तर ४०६ जहाजावरील अधिकारी व कर्मचारी) असल्याची माहिती मुरगाव बंदरातील सूत्रांनी दिली.रविवारी जहाज मुरगाव बंदरात पोहोचल्यानंतर यावरील विदेशी पर्यटकांचे गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आल्याचे दिसून आले. यंदाच्या पर्यटक हंगामातील पहिले विदेशी क्रूझ जहाज गोव्यात पोहोचत असल्याने महामंडळाने येथे गोव्याच्या पारंपरिक संगीतासहीत, पारंपरिक नृत्यू तसेच इतर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. जहाज मुरगाव बंदरात दाखल झाल्यानंतर खाली उतरत असलेल्या विदेशी पर्यटकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे गोव्यात स्वागत करण्यात आल्याचे याप्रसंगी दिसून आले. मस्कतहून गोव्यात आलेले हे जहाज रविवारी उशिरा संध्याकाळी येथून मंगळूरला जाण्यासाठी रवाना होणार असून, तेथून ते कोची येथे जाणार असल्याची माहीती याप्रसंगी उपलब्ध करण्यात आली. येथे उपस्थित असलेल्या एमपीटी (मुरगाव बंदर) च्या कर्मचाऱ्यांनी माहिती देताना यंदाच्या पर्यटक हंगामातील पहिले क्रुझ जहाज गोव्यात दाखल झाल्याचे सांगून येणा-या काळात अन्य अनेक विदेशी क्रुझ जहाजे मुरगाव बंदरात पर्यटकांना घेऊन येणार असल्याची माहिती दिली. विदेशी पर्यटकांना क्रुझ जहाज गोव्यात घेऊन येणार असल्याने गोव्यातील पर्यटक क्षेत्राला याचा आर्थिकरीत्या उत्तम फायदा होणार असून यामुळे टॅक्सी तसेच इतर व्यवसायांना सुद्धा आर्थिकदृष्ट्या लाभ होणार असल्याचे म्हणाले. मुरगाव बंदरातून यापूर्वी दोन राष्ट्रीय क्रुझ जहाज कंपनीच्या सेवेची सुरुवात झालेली असून याचा सुद्धा गोव्यातील पर्यटक क्षेत्राला उत्तम फायदा होत असल्याची माहिती एमपीटी सूत्रांनी दिली.गोव्याच्या पर्यटक हंगाम्यात यंदा गोव्यात येणार ३१ विदेशी क्रुझ जहाजेपर्यटक हंगामातील पहिले क्रुझ जहाज रविवारी गोव्यात दाखल झाले असून यामुळे गोव्याच्या पर्यटक क्षेत्राला विविध प्रकारे चांगला फायदा होणार आहे. यंदाच्या गोवा पर्यटक हंगामाच्या काळात (मे महिन्यापर्यंत) मुरगाव बंदरात ३१ विदेशी क्रुज जहाजे येणार असल्याची माहीती सूत्रांनी देऊन सुमारे ५५ हजार विदेशी पर्यटक क्रुझ जहाजाच्या माध्यमाने गोव्यात येणार आहेत. यंदा गोव्यात ३१ विदेशी क्रुझ जहाजे येणार असल्याने याचा गोव्याच्या पर्यटक क्षेत्राला विविध प्रकारे फायदा होणार असला तरी मागच्या वर्षाच्या संख्येपेक्षा यंदा गोव्यात येणा-या विदेशी क्रुझ जहाजातील संख्येत कपात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागच्या पर्यटक हंगाम्यात गोव्यात ४० विदेशी क्रुझ जहाजे विविध राष्ट्रातून सुमारे ७७ हजार विदेशी पर्यटकांना घेऊन गोव्यात आलेली असल्याची माहीती सूत्रांनी दिली. मागच्या तुलनेत यंदा क्रुज जहाजाच्या संख्येत कपात झाल्याने याचा थोडाफार गोव्याच्या पर्यटक व्यवसायाला परिणाम होणार असे वाटते. दरम्यान गोव्यात येणाºया विदेशी क्रुज जहाजातील संख्येत वाढ करण्यासाठी याच्याशी संबंधीत असलेल्यांची चर्चा चालू असल्याची माहीती मुरगाव बंदरातील विश्वसनीय सूत्रांनी देऊन गोव्यात येणार असलेल्या विदेशी क्रुज जहाजाची संख्या ३१ वरून ३५ पर्यंत पोचण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
गोव्याच्या पर्यटक हंगामातील पहिले विदेशी क्रुझ जहाज १५८७ विदेशी पर्यटकांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2019 7:04 PM