लोकमत न्यूज नेटवर्क काणकोण: सोमवारी रात्री जोरदार वारा, विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे काणकोण तालुक्यात ४० लाखांचे नुकसान झाले. तसेच सत्तरी, डिचोली, बार्देश, वास्को व सासष्टीसह अनेक भागातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. पहिल्याच पावसाने प्रशासनाची झोप उडवली आहे.
काणकोणात सोमवारी रात्री उशिरा झालेल्या पावसामुळे वीज खात्याचे १४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वाऱ्यामुळे वीज खात्याचे ११ सिमेंटचे खांब मोडून पडले, तारा तुटून पडल्याने लाखो रुपयांचे नक नुकसान झाल्याची माहिती वीज अभियंते गोविंद भट यांनी दिली. तर पाळोळे येथे दोन ठिकाणी ४ वाहनांवर माड तसेच आंब्याचे झाड पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील अनेक भागात घरांवर व रॉकवर माड पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसामुळे वीज तारा तुटल्याने अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे पाळोळे, व्होवरे, पाटणे, आगोंद, शिरोटी खोला येथील लोकांना उष्म्याचा त्रास सहन करावा लागला.
राजबाग येथे फ्रान्सिस फर्नांडिस यांच्या घरावर माड पडल्याने सुमारे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शिवर्षापोत पाळोळे येथील सपलेश उमेश धुरी व सम्राट उमेश धुरी याच्या चारचाकी गाडीवर आंब्याचे झाड पडल्याने त्यांनाही लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचे नगरसेवक लक्ष्मण पाणी यानी सांगितले.
आजही पडणार पाऊस
बदललेल्या हवामानामुळे गोव्यावर पावसाचे ढग निर्माण झाले आहेत. त्यामुळे सोमवारी जोरदार पाऊस पडला. बुधवारीही अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. पणजी वेधशाळेच्या डॉप्लर रडारद्वारे टिपलेल्या आकाशाच्या छायाचित्रात गोव्यावर बऱ्याच ठिकाणी पावसाचे ढग दाटले आहेत. त्यामुळे सोमवारी रात्री राजधानी पणजीसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला होता. बुधवारपर्यंत परिस्थिती असेच राहणार असल्यामुळे बुधवारीही पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान, सोमवारी रात्री जोरदार वर्षावानंतर उष्मा उतरणार, अशी अपेक्षा होती. परंतु, मंगळवारी कमाल तापमान ३५ अंशांपेक्षा वर गेले होते. त्यामुळे उकाडा कायम राहिला.
- काणकोण वीज कार्यालयाच्या २५ कामगारांनी अहोरात्र काम करून मंगळवारी पहाटे वीजपुरवठा सुरळीत करून दिला.
- घरावर झाडे पडल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना १६ ठिकाणी पाचारण करण्यात आले. मंगळवारीही काही भागात पडलेली झाडे हटविण्याचे काम सुरु होतो.
- पाळोळे व इतर ठिकाणी माड पडून नुकसानी झाल्याची माहिती मिळाल्यावर काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांनी भेट देऊन पाहणी केली.
- सत्तरी तालुक्यात मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड होऊन वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
- व्होवरे ते पाळोळे येथील रॉकवर माड पडल्याचे नगरसेवक सायमन रेबेलो यांनी सांगितले. तसेच पर्यटकाच्या दोन गाड्यावर माड पडल्याने त्यांनाही लाखोचे नुकसान झाल्याचे रेबेलो यानी सांगितले.