लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: मये, वायंगिणी पंचायत क्षेत्रातील कामगारांचा प्रश्न, प्रदूषण, रोजगार यांसह शेतकऱ्यांचे प्रश्न आधी मार्गी लावा, त्यानंतरच खाण व्यवसाय सुरू करण्याबाबत विचार करावा, अशी भूमिका मये, वायंगिणी पंचायतीच्या ग्रामसभेत करण्यात आली. यासंदर्भात गावचे प्रश्न सुटल्याशिवाय ग्रामपंचायतीने कोणताही नहरकत दाखला देऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
पंचायतीच्या नूतन वास्तूत आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत सरपंच सीमा आरोंदेकर, वासुदेव गावकर, विशांत पेडणेकर, सुवर्णा चोडणकर, वर्षा गडेकर, विनिता पोळे, दिलीप शेट, कनिवी कवठणकर आदींसह पंच सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी सरपंच सीमा आरोंदेकर म्हणाल्या की, 'पंचायत क्षेत्रात खाण व्यवसाय सुरू करण्यास पंचायतीने कोणत्याही प्रकारचा नाहरकत दाखला दिलेला नाही. यासंदर्भात पाहणी करण्यात येणार आहे. आवश्यक बाबींवर निश्चितपणे विचारमंथन केले जाईल. ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात येतील, असे त्यांनी ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्त्या प्रश्नांना उत्तरे देताना आपली भूमिका स्पष्ट केली.
नीलेश कारबोटकर यांच्यासह इतरांनी खाणींचा, कामगारांचा तसेच शेती बागायतींच्या नुकसानीचे प्रश्न उपस्थित केलेल्या गावातून होणारी वाहतूक आणि प्रदूषण याबाबतही ग्रामस्थांनी आपल्या भूमिकेशी ठाम राहताना गावाच्या हिताचे सर्व प्रश्न आधी मार्गी लावावेत, त्यानंतरच खाणींसंदर्भात विचार करण्यात यावा, तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा नाहरकत दाखला खाणींना देऊ नये, अशा प्रकारचा ठराव मांडला. यावेळी इतर विषयांवरही ग्रामस्थांनी आपली मते मांडली. सचिव महादेव नाईक यांनी मागील ग्रामसभेतील अहवाल सादर केला. सरपंच व पंचायत मंडळाने चर्चेत सहभाग घेतला.