पणजी : भारतीय स्वातंत्र्यदिनी मुख्य शासकीय सोहळ्यात तिरंगा कुणी फडकवावा यावरून गोव्यात गेल्या पन्नास वर्षांत कधीच वाद झाला नव्हता. मात्र आता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेत असल्याने गोव्यात वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी अमेरिकेला निघण्यापूर्वी सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे तिरंगा ध्वज फडकविण्याचे काम सोपविले व यामुळे मंत्र्यांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. विरोधी काँग्रेसने याविरुद्ध राज्यपालांना साकडे घातले आहेत तर गोव्याचे एक सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्ज यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठास याचिका सादर केली आहे.
गोव्यात शासकीय स्तरावरून मुख्य सोहळा पणजीतील जुन्या सचिवालयासमोर येत्या 15 रोजी होईल. एरव्ही स्वातंत्र्यदिनी दरवर्षी मुख्यमंत्री पर्रीकर हेच तिरंगा फडकवित आले आहेत. पण यावेळी मुख्यमंत्र्यांनी सभापतींना तो मान दिला. पर्रीकर अमेरिकेहून 17 नंतर गोव्यात परतणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या अनुपस्थितीत एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याला तिरंगा फडकविण्याचा मान का दिला नाही, अशा प्रकारची विचारणा केली जात आहे. पर्रीकर मंत्रिमंडळातीलही काही मंत्री याविषयी आपआपसांत चर्चा करत आहेत.
सभापती म्हणजे स्वतंत्र संस्था असून या संस्थेचा सरकारच्या रोजच्या कामाशी काही संबंध नसतो, सभापती हे नि:पक्षपाती असतात, त्यामुळे सरकारी सोहळ्यात त्यांना तिरंगा फडकविण्यास न सांगता एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याला सांगावे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे म्हणणे आहे. चोडणकर यांनी याविषयी राज्यपाल मृदुला सिन्हा यांनाही पत्र लिहिले आहे. सभापतींना तिरंगा फडकविण्यास न सांगता तुम्हीच तिरंगा फडकवा, अशी विनंती चोडणकर यांनी पत्रातून केली आहे.
हायकोर्टाचे वकील तथा सामाजिक कार्यकर्ते रॉड्रिग्ज यांनी सोमवारी न्यायालयाला पत्र याचिका सादर केली आहे. सभापतींना तिरंगा फडकविण्यासाठी नियुक्त करण्याचा मुख्यमंत्री पर्रीकर यांचा निर्णय रॉड्रिग्ज यांना मान्य नाही. त्यांनी या विषयात न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी विनंती केली आहे.
दरम्यान, सभापतींनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत तिरंगा फडकवू नये, असे कुठच्याच घटनेत किंवा कायद्यात म्हटलेले नाही, असे सभापती प्रमोद सावंत यांनी लोकमतला सांगितले. आपल्यावर मुख्यमंत्री पर्रीकर यांनी विश्वास ठेवला आहे. आपण मुख्य शासकीय सोहळ्य़ात तिरंगा फडकविणार आहोत ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे सावंत म्हणाले.