लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: यंदाच्या पर्यटक हंगामातील पहिले देशांतर्गत क्रूज जहाज पर्यटक आणि जहाजावरील अधिकारी, कर्मचारी मिळून ७९० जणांना घेऊन शुक्रवारी (दि. २३) मुरगाव बंदरात दाखल झाले.
अगाती, लक्षद्वीप येथून २१८ पर्यटक आणि ५७२ जहाजावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना घेऊन जहाज शुक्रवारी मुरगाव बंदरात दाखल झाल्यानंतर संध्याकाळी येथून ते मुंबईला जाण्यासाठी रवाना झाले. यंदाच्या पर्यटक हंगामात गोव्याच्या मुरगाव बंदरातील क्रूज जहाज धक्क्यांवर राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय मिळून ७२ जहाजे येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
शुक्रवारी पहाटे ५.३० च्या सुमारास एम व्ही इम्प्रेस' हे जहाज अगाती, लक्षद्विप येथून पर्यटकांना घेऊन दाखल झाले. पुढचे जहाज १४ ऑक्टोबरला मुरगाव बंदरात येणार आहे, तर पर्यटक हंगामातील पहिले विदेशी जहाज ११ नोव्हेंबर रोजी सकाळी मुरगाव बंदरात दाखल होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यंदाच्या पर्यटक हंगामात गोव्याच्या मुरगाव बंदरात पर्यटकांना घेऊन येणार असलेल्या ७२ क्रूज जहाजांपैकी ४० देशांतर्गत आणि ३२ अंतरराष्ट्रीय क्रूज जहाजे असणार असल्याची माहिती प्राप्त झाली.