मडगाव: गोव्यात इन्सुलेटेड वाहनांतून मासळीची वाहतूक करण्याची सक्ती केल्यामुळे त्याचे विपरित परिणाम जवळपासच्या कारवार जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायावर झाला आहे. गोव्यातील या अघोषित बंदीला आव्हान देण्यासाठी शनिवारी कारवारच्या मत्स्योद्योजकांनी माजाळी येथे गोव्यातून मासळी घेऊन गेलेली वाहने अडवून धरली. जोपर्यंत गोव्यात कारवारचे मासे आणायला देत नाहीत तोपर्यंत गोव्यातले मासेही कारवारात आणू देणार नाहीत, असा इशारा या आंदोलकांनी दिला. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गोवा सरकारला एक आठवड्याची मुदत यावेळी देण्यात आली.शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कारवारच्या उद्योजकांनी ही वाहने अडविली. यातील बहुतेक वाहने कर्नाटक रजिस्ट्रेशनची होती आणि गोव्यातून मासळी घेऊन ती कारवारला जात होती. गोव्यातील पोळे चेकनाक्यातून वाहने सुटल्यावर लगेच माजाळीच्या चेक पोस्टवर ती अडविण्यात आली. यावेळी कारवार जिल्ह्याचे जिल्हा पंचायत सदस्य सदानंद मेथा यांनी गोवा सरकारने आमच्या वाहनांवर बंदी घातल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. आमचे आंदोलन यापुढेही चालू राहील असे सांगितले.गोव्याबाहेरून आणले जाणारे मासे जर फॉर्मेलिन घालून आणले जात असतील तर ते आंध्र प्रदेश व केरळ या दूरच्या राज्यातून आणण्याची शक्यता आहे. कारवार गोव्यापासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर आहे. एवढय़ा कमी अंतरावर मासळी वाहून नेताना आम्ही फॉर्मेलिन का म्हणून घालणार असा सवाल त्यांनी केला. गोव्यातील पर्यटन व्यवसाय कारवार व मालवणातील माशांवर चालतो याची जाणीव गोवा सरकारने ठेवण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
गोव्यातून जाणारी मासळी कारवार चेक नाक्यावर अडवली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 3:48 PM